आक्रमण, बचावात सुधारणा अत्यावश्‍यक - ग्रॅहम रिड

वृत्तसंस्था
Monday, 4 November 2019

- ग्रॅहम रिड यांनी अजूनही बचाव आणि आक्रमणाच्या अंतिम टप्प्यात कमालीची सुधारणा आवश्‍यक असल्याचे खडे बोल खेळाडूंना सुनावले. 

-  आक्रमणाला अंतिम "टच' देण्यात सुधारणा आवश्‍यक आहे. आम्ही अनेक संधी निर्माण करतो, पण त्या तुलनेत गोल खूपच कमी होतात.

मुंबई/भुवनेश्‍वर - ऑलिंपिक पात्रता हॉकीच्या दुसऱ्या लढतीत भारताने रशियास सहा गोलच्या फरकाने पराजित केले, पण त्यानंतर काही वेळातच मार्गदर्शक ग्रॅहम रिड यांनी अजूनही बचाव आणि आक्रमणाच्या अंतिम टप्प्यात कमालीची सुधारणा आवश्‍यक असल्याचे खडे बोल खेळाडूंना सुनावले. 
खेळाडू म्हणून मी ऑलिंपिक पदक जिंकले असले तरी मार्गदर्शक म्हणून जिंकलेले नाही, हे मला सलत आहे. ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी नऊ महिने आहेत. त्यात संघाची कामगिरी उंचावण्यासाठीच प्रयत्न करावे लागतील. त्यासाठीची प्रक्रिया खूप महत्त्वाची असते, असे रिड यांनी सांगितले. 
आमच्या आक्रमणाला अंतिम "टच' देण्यात सुधारणा आवश्‍यक आहे. आम्ही अनेक संधी निर्माण करतो, पण त्या तुलनेत गोल खूपच कमी होतात. बचावही अधिक भक्कम होण्याची गरज आहे. प्रतिस्पर्ध्यांना गोलच्या सोप्या संधी देत आहोत, असे त्यांनी सांगितले. आता एफआयएच प्रो लीगमधील लढतींचा ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी नक्कीच फायदा होईल. ऑलिंपिकपर्यंतच्या प्रत्येक लढतीसाठी सर्व प्रमुख खेळाडू उपलब्ध असतील, तर त्याचा खूप फायदा होईल, असेही ते म्हणाले. 
------------------------------- 
संपूर्ण सामन्यात चांगला खेळ हवा 
अमेरिकेविरुद्धच्या परतीच्या सामन्यात विश्रांतीपूर्वी आमचा खेळ खराब झाला, त्याचवेळी अखेरच्या दोन सत्रांत खूपच चांगला खेळ झाला. संपूर्ण सामन्यात सरस खेळ होण्याची गरज असल्याचे महिला हॉकी संघाचे मार्गदर्शक शुअर्ड मरिन यांनी सांगितले. अमेरिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पहिल्या दोन सत्रांत आमच्या खेळाडू काय करीत आहेत हेच कळत नव्हते. इतक्‍या चुका कशा होतात हाच प्रश्‍न मला सलत होता. विश्रांतीच्या वेळी त्यांना पहिली दोन सत्रे विसरण्यास सांगितले. त्याचबरोबर सतत धावत राहा, म्हणजे सामन्यात काय होणार हा विचार मनात येणार नाही, अमेरिकाही दडपणाखाली येईल, असे सांगितले. तेच घडले, असे मरिन यांनी सांगितले. 
 


​ ​

संबंधित बातम्या