सॅफ फुटबॉल - एकतर्फी विजयासह भारत अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
Friday, 27 September 2019

-भारतीय युवा फुटबॉल संघाने 18 वर्षांखालील सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

-उपांत्य फेरीच्या सामन्यात मालदिवचा 4-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत आता भारताची गाठ रविवारी (ता. 29) बांगलादेशशी पडणार आहे. 

-भारताच्या या एकतर्फी विजयात नरेंदर गेहलोत, मन्वीर सिंग, निथोइंगान्बा मीतेई यांनी गोल केले. तर मालदिवच्या अहनाफ राशीध याने एक स्वयंगोल केला. 

काठमांडू (नेपाळ) -  भारतीय युवा फुटबॉल संघाने 18 वर्षांखालील सॅफ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मालदिवचा 4-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत आता भारताची गाठ रविवारी (ता. 29) बांगलादेशशी पडणार आहे. 
भारताच्या या एकतर्फी विजयात नरेंदर गेहलोत, मन्वीर सिंग, निथोइंगान्बा मीतेई यांनी गोल केले. तर मालदिवच्या अहनाफ राशीध याने एक स्वयंगोल केला. 
सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून आक्रमक खेळ करणाऱ्या भारताला सातव्या मिनिटालाच गोल करण्याची संधी मिळाली. त्या वेळी नरेंदरने हेडरद्वारे जाळीचा वेध घेतला. त्यानंतर अनेकदा भारतीय खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. पण, त्यांना आघाडी वाढवण्यात अपयश आले. गिवसन, निन्थोई, जॅकसन सिंग आणि थोएबा सिंग यांच्या वेगवान खेळाने मालदिवच्या बचावपटूंची कसोटी लागली. पूर्वार्धात मालदिव संघाकडूनही गोल करण्याचे काही प्रयत्न झाले. पण, भारतीय बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. भारतीय आक्रमकांचे प्रयत्न हाणून पाडण्याच्या प्रयत्नात पूर्वार्धातील भरपाई वेळेत मालदिवच्या राशीधने आपल्याच संघावर गोल केला. 
उत्तरार्धात भारतीय प्रशिक्षकांनी बचावात्मक खेळावर भर देण्याच्या सूचना केल्या. त्यांनी अकाश मिश्राला अमन छेत्रीच्या जागी खेळवले. त्यामुळे रवी बहादूर राणाला डाव्या बाजूने खेळावे लागले. आकाशला थेट गोल करण्याची चांगली संधी होती, पण मालदिव गोलरक्षकाने ती फोल ठरवली. सामन्याला 10 मिनिटे बाकी असताना मन्वीरने मालदिवच्या गोलरक्षकाला चकवले आणि भारताचा तिसरा गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला उजव्या बगलेतून मुसंडी मारणाऱ्या निन्थोईने गोलकक्षाच्या बाजूवरून चेंडूला थेट जाळीची दिशा देत भारताचे वर्चस्व सिद्ध करणारा गोल केला.


​ ​

संबंधित बातम्या