सलग दुसऱ्या वर्षी हॉकी विश्वकरंडकाचे भारतास यजमानपद

वृत्तसंस्था
Friday, 8 November 2019

- भुवनेश्वरमध्ये गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेली विश्वकरंडक हॉकी स्पर्धा आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरल्याने चार वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपदही भारतास देण्यात आले

- महिलांच्या स्पर्धा यजमानपदातून भारताने त्यानंतर माघार घेतली. या स्पर्धेचे यजमानपद स्पेन आणि नेदरलॅंडस्‌ला संयुक्तपणे देण्याचे ठरले

मुंबई -  भारताची जागतिक हॉकीतील आर्थिक ताकद पुन्हा एकदा दिसून आली. भुवनेश्वरमध्ये गतवर्षी डिसेंबरमध्ये झालेली विश्वकरंडक हॉकी स्पर्धा आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरल्याने चार वर्षांनी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपदही भारतास देण्यात आले आहे. 
भारतास 2023च्या विश्वकरंडक पुरुष हॉकी स्पर्धा संयोजनासाठी अखेरपर्यंत दरवर्षी किमान दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेणारे मलेशिया आणि जगज्जेते बेल्जियम यांनी कडवे आव्हान दिले, पण भारताची आर्थिक ताकद अखेर सरस ठरली असे मानले जात आहे. जागतिक हॉकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी थिएरी वेल यांनी याचेच संकेत दिले. ते म्हणाले, हॉकीचा जागतिक प्रसार करण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आर्थिक निधिची गरज असते. त्यामुळे यजमानपदाचा निर्णय घेताना स्पर्धेतून मिळणारे उत्पन्न नक्कीच लक्षात घेतले जाते. 
भारताने सुरुवातीस पुरुष तसेच महिला हॉकीच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दाखवली होती. महिलांच्या स्पर्धा यजमानपदातून भारताने त्यानंतर माघार घेतली. या स्पर्धेचे यजमानपद स्पेन आणि नेदरलॅंडस्‌ला संयुक्तपणे देण्याचे ठरले आहे. ही स्पर्धा 2022 मध्ये 1 ते 17 जुलै दरम्यान होईल. 
--------------------- 

प्रथमच एका देशाला सलग यजमानपद 
भारतात विश्वकरंडक हॉकी स्पर्धा आता चौथ्यांदा होईल. आश्‍चर्य म्हणजे 1975 च्या स्पर्धेचे यजमानपद भारतास अंतर्गत कलहामुळे गमवावे लागले होते. आता 2018 पाठोपाठ 2023 मध्ये भारतात विश्वकरंडक स्पर्धा होईल. याशिवाय भारतात यापूर्वी 1979 आणि 2010 मध्ये स्पर्धा झाली होती. 
 


​ ​

संबंधित बातम्या