भारतीय कुस्तीत व्हीआयपी संस्कृती नको

वृत्तसंस्था
Thursday, 3 October 2019

-  भारतीय कुस्तीत व्हीआयपी संस्कृती नको, असे सांगत भारतीय कुस्ती महासंघाने फ्री-स्टाईल मार्गदर्शक होसेन करिमी यांच्याबरोबरील करार सहा महिन्यांतच संपवला

- करिमी यांचे सहकारी मार्गदर्शकांबरोबर कधीही जमले नाही. ते सतत तक्रार करीत, नाही तर काहीतरी मागणी करीत

नवी दिल्ली - भारतीय कुस्तीत व्हीआयपी संस्कृती नको, असे सांगत भारतीय कुस्ती महासंघाने फ्री-स्टाईल मार्गदर्शक होसेन करिमी यांच्याबरोबरील करार सहा महिन्यांतच संपवला. करिमी यांची नियुक्ती टोक्‍यो ऑलिंपिकपर्यंत करण्यात आली होती. 
करिमी हे व्हीआयपी होते. त्यांच्या मागण्यांची पूर्तता करणे दिवसेंदिवस अवघड जात होते. त्यांना दूर करण्याचा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरणास कळवला आहे. नव्या मार्गदर्शकांचा शोध सुरू केला आहे, असे भारतीय कुस्ती महासंघाचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. 
करिमी यांचे सहकारी मार्गदर्शकांबरोबर कधीही जमले नाही. ते सतत तक्रार करीत, नाही तर काहीतरी मागणी करीत. त्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या हॉस्टेलमध्ये राहण्यास नकार दिला. त्यासाठी फ्लॅट भाड्याने घ्यावा लागला. त्यांना भारतातील प्रवासासाठी कायम कारची आवश्‍यकता असे. ते रूम कोणाबरोबर शेअर करण्यास तयार नव्हते. जागतिक स्पर्धेच्या वेळीही त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. आम्ही त्यांना साडेतीन हजार डॉलर मानधन देत होतो; पण त्यांच्यावरील महिन्याचा खर्च पाच हजार डॉलरपर्यंत होत असे, असेही तोमर यांनी सांगितले. 
----------- 
प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी करिमी यांना मार्गदर्शक म्हणून मॅटजवळची जागा हवी; पण खेळाडूंचा घाम पुसण्याचीही त्यांची तयारी नसे. शिबिरातही त्यांनी कधीही स्वतः काही करून दाखवलेच नाही. घामेजलेल्या कुस्तीगीरांना हात लावणे त्यांना आवडत नसे, हे भारतात कसे चालेल? 
- विनोद तोमर, भारतीय कुस्ती महासंघाचे सहायक सचिव 

भारतात कसली यंत्रणाच नाही. कुस्तीच्या वाढीसाठी कोणतेही कार्यक्रम नाहीत. सतत काहीतरी प्रश्‍न असतात. त्यामुळे काही नीट करताही येत नाही. 
- होसेन करिमी, बडतर्फ कुस्ती मार्गदर्शक 


​ ​

संबंधित बातम्या