नवोदित बेल्जियम संघाकडून भारतीय हॉकी संघाचा कस

वृत्तसंस्था
Thursday, 26 September 2019

-जगज्जेत्या बेल्जियमने चार नवोदितांना खेळविल्यानंतरही भारतास विजयासाठी झगडावे लागले.

-कर्णधार मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंगच्या गोलमुळे भारतीय हॉकी संघास बेल्जियमला त्यांच्या देशात 2-0 पराजित केल्याचे समाधान लाभले. 

मुंबई - जगज्जेत्या बेल्जियमने चार नवोदितांना खेळविल्यानंतरही भारतास विजयासाठी झगडावे लागले. कर्णधार मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंगच्या गोलमुळे भारतीय हॉकी संघास बेल्जियमला त्यांच्या देशात 2-0 पराजित केल्याचे समाधान लाभले. 
बेल्जियम पूर्ण ताकदीनिशी खेळत नसल्याचे भारतीय संघाने जाणले आणि सुरुवातीपासून आक्रमण सुरू केले, पण बेल्जियमचा बचाव भक्कम होता. एवढेच नव्हे तर त्यांनी जोरदार प्रतिआक्रमणे करीत भारतीय बचावावर दडपण आणले. दुसऱ्या सत्रात काहीशा स्थिरावलेल्या भारतीय संघाने लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले खरे, पण नेहमीचे दुखणे कायम राहिले. पेनल्टी क्षेत्रात वर्चस्व राखण्यात आलेले अपयश भारतास भोवण्याची चिन्हे दिसू लागली. चेंडूवर भारताचे जास्त वर्चस्व होते खरे, पण गोलक्षेत्रात वर्चस्व नसल्याने गोलच्या संधी दुरावत होत्या. 
विश्रांतीनंतरच्या नवव्या मिनिटास मनदीपने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. चौथ्या सत्रात भारतीयांनी दोन पेनल्टी कॉर्नर दवडले. त्यातच भारतीय बचाव काहीसा कोलमडू लागला. त्यामुळे अखेरच्या मिनिटात भारतीय गोल स्वीकारणार असे वाटू लागले. मात्र आकाशदीपने 54 व्या मिनिटास गोल करीत भारतास विजयी केले. यामुळे भारताने बेल्जियमविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. आता भारताची शनिवारी लढत स्पेनविरुद्ध होईल.


​ ​

संबंधित बातम्या