टे.टे. संघासाठी आता दोन परदेशी मार्गदर्शक

वृत्तसंस्था
Monday, 7 October 2019

- दीर्घ काळ प्रतीक्षा असलेले देजान पापिक नोव्हेंबरच्या मध्यास भारतीय टेबल टेनिस संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील

- अमेरिकेचे माजी मार्गदर्शक जॉर्ग बिटझ्‌गालो यांची अतिरिक्त मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय भारतीय टेबल टेनिस महासंघाने घेतला आहे.

मुंबई - दीर्घ काळ प्रतीक्षा असलेले देजान पापिक नोव्हेंबरच्या मध्यास भारतीय टेबल टेनिस संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील. पण, त्यानंतरही अमेरिकेचे माजी मार्गदर्शक जॉर्ग बिटझ्‌गालो यांची अतिरिक्त मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय भारतीय टेबल टेनिस महासंघाने घेतला आहे. 
पापिक गुडघा दुखापतीने बेजार असल्याने त्यांचे आगमन लांबल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पर्यायी मार्गदर्शकांचा शोध सुरू होता. पापिक यांनी आगमनाची तारीख कळवली असली, तरी जर्मनीच्या बिटझ्‌गालो यांना लवकरात लवकर करारबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिटझ्‌गालो यांनी अमेरिकेचे मार्गदर्शकपद सोडले आहे. पण, त्यांना काही दिवस थांबण्याची विनंती करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली आहे. पण, काही आठवड्यांतच आपण भारतात येऊ शकतो, असेही कळविले आहे. 
बिटझ्‌गालो जर्मन लीगमध्ये शरथ कमलचे दुहेरीतील सहकारी होते. त्यांच्या नियुक्तीच्या विनंतीचा प्रस्ताव क्रीडा प्राधिकरणाकडे पाठविला आहे. क्रीडा मंत्रालयाची मंजुरी येईपर्यंत त्यांचा खर्च करण्याची भारतीय टेबल टेनिस महासंघाची तयारी आहे. बिटझ्‌गालो तीन-चार वर्षे संघासोबत राहू शकतील. त्यांच्या मार्गदर्शनाचा खेळाडूंना फायदा होईल, असेही टेबल टेनिस महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
पापिक यांच्याबरोबरील करार मार्चमध्ये अपेक्षित होता. पण, तो जुलैपर्यंत लांबला. आता त्यांचे आगमन नोव्हेंबरपर्यंत लांबले आहे. भारतीय टेबल टेनिसपटूंनी यापूर्वीच ऑलिंपिकसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यात पापिक फार बदल करणार नाहीत, अशीच खेळाडूंची आशा आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या