देशात टेनिस संस्कृती नसल्याची महेश भूपतीची खंत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

-महेश भूपती यांनी देशात टेनिस संस्कृती विकसित नसल्याची खंतही व्यक्त केली. 

-सुमीतमध्ये टॉप 100 खेळाडूंत येण्याची क्षमता निश्‍चितच आहे. त्याने अमेरिकन ओपनमध्ये अफलातून खेळ केला.

-देशातील सध्याचे युवा खेळाडू बिनधास्त आहेत, असे प्रमाणपत्र महेश भूपती यांनी दिली. ते प्रतिस्पर्ध्यांना अजिबात घाबरत नाहीत

-राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या दोन्ही महान टेनिसपटूंचा आपण 50-50 टक्के चाहता आहे

पणजी - भारतीयांच्या नसानसांत टेनिस नाही, त्यामुळे हा खेळ देशात मोठ्या प्रमाणात फोफावला नसल्याचे मत व्यक्त करताना, महेश भूपती यांनी देशात टेनिस संस्कृती विकसित नसल्याची खंतही व्यक्त केली. 
महेश भूपती यांच्या "महेश भूपती टेनिस अकादमी'ची रविवारी गोव्यात सुरवात झाली. शुभारंभ सोहळ्यास आलेल्या भूपती यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुणे आणि बंगळूरनंतर आता गोव्यात महेश भूपती टेनिस अकादमी कार्यान्वित झाली आहे. 
पद्मश्रीने सन्मानित झालेल्या 45 वर्षीय भूपती यांनी दुहेरीत 4 आणि मिश्र दुहेरीत 8 मिळून एकूण 12 ग्रॅंडस्लॅम विजेतिपदे मिळविली आहेत. सध्या ते भारताच्या डेव्हिस करंडक संघाचे न खेळणारे कर्णधारही आहेत. 
भूपती म्हणाले, ""भारतीयांच्या डीएनएत टेनिस नाही. त्यामुळे देशात टेनिसचा मोठा विकास पाहायला मिळत नाही. मी, लिअँडर पेस, सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा यांच्यानंतर देशाला ग्रॅंडस्लॅम विजेता टेनिसपटू गवसलेला नाही. आपल्याकडे नसानसांत टेनिस नसणे हेच यामागचे मुख्य कारण आहे.'' टेनिस हा वैयक्तिक, किंबहुना खासगी खेळ असल्याचे मत भूपती यांनी मांडले. 

सुमीतला शाबासकी 
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत लिजंड टेनिसपटू रॉजर फेडरर याला झुंजविणारा भारताचा 22 वर्षीय युवा टेनिसपटू सुमीत नागल याला भूपती यांनी शाबासकी दिली. ""सुमीतमध्ये टॉप 100 खेळाडूंत येण्याची क्षमता निश्‍चितच आहे. त्याने अमेरिकन ओपनमध्ये अफलातून खेळ केला. त्याची गुणवत्ता स्पेशल आहे, तो खूपच उच्च दर्जाचा खेळाडू आहे,'' असे भारताच्या युवा टेनिसपटूचे कौतुक करताना भूपती म्हणाले. टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय टेनिस संघाचा कर्णधार या नात्याने जाणे आपल्याला आवडेल, असेही ते म्हणाले. 

आजचे युवा बिनधास्त 
देशातील सध्याचे युवा खेळाडू बिनधास्त आहेत, असे प्रमाणपत्र महेश भूपती यांनी दिली. ते प्रतिस्पर्ध्यांना अजिबात घाबरत नाहीत. आम्ही कोणालाही हरवू शकतो या आत्मविश्वासाने ते भारलेले आहेत. नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधू याच कारणास्तव आंतरराष्ट्रीय मैदानावर सफल ठरल्याचे भूपती यांनी नमूद केले. 

गोमंतकीयांना संधी मिळेल 
गोव्यातील आपल्या टेनिस अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या युवा खेळाडूंत असामान्य कौशल्य आढळले, तर नक्कीच त्या खेळाडूस बंगळूरमधील आपल्या मुख्य अकादमीत नेले जाईल. गोमंतकीय गुणवत्तेला निश्‍चितच संधी मिळेल, असे महेश भूपती यांनी गोव्यात अकादमी सुरू करण्यामागचा उद्देश विषद करताना सांगितले. ""लगेच फळ मिळणार नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. टेनिसमध्ये कौशल्यसंपन्न होण्यापर्यंतची प्रक्रिया खूपच मोठी असते,'' असा सल्ला त्यांनी दिला. 

नदाल- फेडरर 50-50 
राफेल नदाल आणि रॉजर फेडरर या दोन्ही महान टेनिसपटूंचा आपण 50-50 टक्के चाहता आहे, असे महेश भूपती यांनी एका प्रश्नावर सांगितले. 19 ग्रॅंडस्लॅम करंडकासह फेडररच्या आणखीनच जवळ पोचावा यासाठी अमेरिकन ओपनमध्ये नदालच जिंकावा असे आपणास वाटत होते, असे भूपती यांनी सांगतले. ""पुढील मोसमातही फेडरर, नदाल, जोकोविच या तिघांचाच दबदबा राहण्याचे संकेत आहेत. त्यांना आव्हाने देणारे नाहीत, तरीही मला वाटते, की कोणीतरी नवा विजेता व्हायला हवा,'' असे सध्याच्या जागतिक पुरुष टेनिसवर भाष्य करताना भूपती म्हणाले. 


​ ​

संबंधित बातम्या