कुमार बॅडमिंटन संघाचा सलग तिसरा विजय
- मेईराबा लुवांग आणि तासनीम मीर यांच्या चमकदार विजयाच्या जोरावर भारताने जागतिक कुमार सांघिक मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत सलग तीन लढतीत विजय मिळवला.
- स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियास 4-1 आणि आर्मेनियाला 5-0 असे सहज हरविले.
मुंबई - मेईराबा लुवांग आणि तासनीम मीर यांच्या चमकदार विजयाच्या जोरावर भारताने जागतिक कुमार सांघिक मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत सलग तीन लढतीत विजय मिळवला. कैझान (रशिया) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियास 4-1 आणि आर्मेनियाला 5-0 असे सहज हरविले.
तनिषा क्रॅस्टो-ईशान भटनागरने तीन गेमपर्यंत रंगलेली मिश्र दुहेरीची लढत जिंकत भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी सुरवात करून दिली. मेईराबा लुवांगने मुलांच्या एकेरीची लढत दोन गेममध्ये जिंकत भारताची आघाडी वाढवली. तासनीम मीर हिनेही मुलींची एकेरीची लढत 22 मिनिटांत जिंकत भारताचा विजय निश्चित केला. मनजितसिंग ख्वैराकपम-डिंको सिंग तोथोजाम यांनी दुहेरीची लढत जिंकत भारताचा विजय सफाईदार केला. भारतीय जोडीस या विजयासाठी 35 मिनिटे आणि तीन गेमपर्यंत लढावे लागले. अदिती भट्ट- तनिषा क्रॅस्टोला मुलींच्या दुहेरीच्या लढतीत हार पत्करावी लागली. भारताने आर्मेनियास कोणतीही संधी दिली नाही. भारताने यापूर्वी अमेरिकेस 4-1 असे पराजित केले होते. भारताची या स्पर्धेतील गटविजेतेपदासाठी लढत जपानविरुद्ध होईल. जपानने आत्तापर्यंत स्पर्धेत एकही लढत गमावलेली नाही. त्यामुळे भारताचा चांगलाच कस लागेल.