World Cup 2019 : सचिनचा कॅच कधीच सोडायचा नसतो.. नाहीतर तुमचा 'अब्दुल रझ्झाक' होतो!

मुकुंद पोतदार
Saturday, 15 June 2019

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची स्वप्नं असतात. त्यातही पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी व्हावी, आपण संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा, अशी इच्छा असते. याचे कारण "कट्टर' प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळल्यास मायदेशात जास्त लोकप्रियता मिळते.

वर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची स्वप्नं असतात. त्यातही पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी व्हावी, आपण संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलावा, अशी इच्छा असते. याचे कारण "कट्टर' प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळल्यास मायदेशात जास्त लोकप्रियता मिळते. साहजिकच ऍशेस मालिकेत पराक्रम करण्यास इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू आतुर असतात. "ट्रान्स-टास्मन' मालिकेतील वर्चस्वासाठी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड जिवाचे रान करतात. भारत-पाकिस्तान असेच कडवे प्रतिस्पर्धी आहेत. अशा "कट्टर' प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना एकीकडे सर्वोत्तम कामगिरीचे स्वप्न असते, तर दुसरीकडे आपल्याकडून मानहानिकारक कामगिरी होऊ नये, अशीही माफक आशा असते!

भारत-पाकिस्तान लढतींबाबत बोलायचे झाल्यास प्रामुख्याने शारजामध्ये केवळ भारताविरुद्ध चमकदार कामगिरी केलेले इजाझ अहमद, मंजूर इलाही, अकीब जावेद असे क्रिकेटपटू पाकिस्तानात "सुपरस्टार' झाले. यातील बहुतेकांना इतर संघांविरुद्ध असे घवघवीत यश मिळालेले नाही; पण केवळ भारताविरुद्धची कामगिरी त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यासाठी पुरेशी ठरली.

या पार्श्‍वभूमीवर अब्दुर रझ्झाकच्याबाबतीत नेमके उलटे घडले. 2003च्या दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत "अ' गटात भारत-पाकिस्तान लढत आकर्षण होती. पाकने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत सात बाद 273 धावा केल्या होत्या. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग-सचिन यांनी भारताला 53 धावांची सलामी दिली होती. मात्र, वकार युनूसने त्याच धावसंख्येवर सेहवाग आणि गांगुलीला लागोपाठ बाद केले. गांगुली पहिल्याच चेंडूवर अर्थातच भोपळा न फोडता बाद झाला. त्यानंतर भारताची मदार सचिनवर होती. भारताची 2 बाद 57 अशी स्थिती होती. सचिनच्या 32 धावा झाल्या होत्या.

त्यानंतरच्याच षटकात वसीम अक्रमने सचिनला चकविले. सचिनचा "लॉफ्टेड ड्राइव्ह' मिडॉफच्या दिशेने गेला. तेथे रझ्झाक होता; पण चेंडू त्याच्या डाव्या हाताला लागून खाली पडला. पाक संघाला धक्काच बसला. त्यातही अक्रमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसला नाही. वास्तविक बरोबर 30 यार्ड वर्तुळापाशी थांबण्याची सूचना त्याने रझ्झाकला केली होती. मात्र, रझ्झाक थोडा पुढे गेला. परिणामी, चेंडू लवकर आणि जास्त वेगाने त्याच्यापाशी गेला. साहजिकच झेल सुटला.

अक्रमच्या हे लक्षात आले. त्याने रागावून रझ्झाकला सवाल केला, "तुझे पता है, तूने किसका कॅच छोडा है?' मग तो म्हणाला, "तू अगर वहॉं खडा होता तो आसान कॅच था...'

सचिनला रझ्झाककडून मिळालेले हे जीवदान पाकिस्तानला भोवले. सचिनने 98 धावांची खेळी केली. अखेर शोएब अख्तरने त्याला बाद केले; पण भारताने तब्बल 26 चेंडू राखून विजय मिळविला.

रझ्झाकला त्या चुकीचा आजही पश्‍चात्ताप होतो. अक्रमच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यामागील कारण त्याने नंतर एका मुलाखतीत स्पष्ट केले. "सचिन फार धूर्तपणे "प्लेसमेंट' करतो आणि एकेरी-दुहेरी धावा काढतो. त्याला रोखण्यासाठीच मी थोडा पुढे गेलो होतो,' असे त्याने सांगितले होते; पण क्षेत्ररक्षणाबाबत यष्टिरक्षक आणि गोलंदाजाला जास्त चांगला अंदाज असतो आणि हेच नेमके रझ्झाक विसरला आणि त्याला कारकिर्दीत कटू प्रसंगाला सामोरे जावे लागले.


​ ​

संबंधित बातम्या