World Cup 2019 : तेव्हा अजय जडेजानं बडवलं होतं पाकिस्तानला आणि मग...

मुकुंद पोतदार
Saturday, 15 June 2019

आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायिक खेळात एखादा खेळाडू "झोन'मध्ये येतो, असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की, त्यादिवशी तो खेळाडू जे काही करेल, ते "क्‍लिक' होत जाते. अर्थात, हे काही योगायोगाने किंवा अपघाताने घडत नसते.

वर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायिक खेळात एखादा खेळाडू "झोन'मध्ये येतो, असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की, त्यादिवशी तो खेळाडू जे काही करेल, ते "क्‍लिक' होत जाते. अर्थात, हे काही योगायोगाने किंवा अपघाताने घडत नसते. "नेट'मध्ये वर्षानुवर्षे केलेल्या सरावाचे ते फळ असते आणि फक्त नशिबाची "हंड्रेड पर्सेंट' साथ लाभणे त्यात निर्णायक ठरलेले असते. 1996च्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात बंगळूरला पाकिस्तानविरुद्ध भारताचा अजय जडेजा असाच "झोन'मध्ये आला आणि त्याने वकार युनूसच्या गोलंदाजीची धुलाई केली.

जडेजा मैदानावर उतरला तेव्हा भारताची 42व्या षटकात 4 बाद 200 अशी स्थिती होती. त्या वेळी भारताला किमान अडीचशेच्या आत रोखण्याची पाकला आशा होती. मात्र, जडेजाने तुफानी फटकेबाजी केली. त्यामुळे वकारच्या शेवटच्या दोन षटकांत अनुक्रमे 18 व 22 अशा एकूण 40 धावांची लयलूट झाली. विशेष म्हणजे आधीच्या आठ षटकांत वकारने फक्त 27 धावा दिल्या होत्या. जडेजाने 25 चेंडूंना सामोरे जाताना चार चौकार व दोन षटकारांसह 45 धावा केल्या. त्याचे आक्रमण निर्णायक ठरले. कारण, 287 धावा करून मग भारताने 39 धावांच्या फरकाने विजय मिळविला!

ही खेळी किंबहुना आणखी स्पष्ट सांगायचे झाल्यास केवळ दोन षटकांतील फटकेबाजी जडेजाच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य ठरली. पहिला मुद्दा म्हणजे तो "वर्ल्ड कप'मध्ये खेळत होता. दुसरा मुद्दा म्हणजे तो बाद फेरीचा सामना होता. तिसरा मुद्दा म्हणजे समोरचा गोलंदाज वकार होता. जडेजाने वकारला दोन षटकारही खेचले. हा पराक्रम कसा काय केला, याचे रहस्य जडेजाने नंतर सांगितले. "वकार जास्त धोका पत्करणार नाही. "इनस्वींगिंग यॉर्कर'चे हुकमी अस्त्रच तो वापरणार, हे मी अचूक हेरले होते. त्यानुसार मी आधीच "पोझिशन' घेत "ऍटॅक' केला,' असा "राज' जडेजाने सांगितला होता.

जडेजा फिरकी गोलंदाजीवर हुकूमत गाजवायचा; पण वेगवान गोलंदाजी त्याला तेवढी आवडायची नाही. स्वतः त्यानेच हे मान्य केले आहे. त्यामुळे तेव्हा मुश्‍ताक अहमदच्या उरलेल्या एका "ओव्हर'कडे त्याचे लक्ष होते. पण नंतर त्यालासुद्धा आपण "झोन'मध्ये केव्हा गेलो हे कळले नाही.
त्याआधी नवज्योतसिंग सिद्धूची 93 धावांची खेळी आणि नंतर वेंकटेश प्रसादच्या तीन बळींच्या जोरावर भारताने विजय साकार केला.
जडेजाचे वैशिष्ट्य म्हणजे तो "फिल्डिंग' आनंदाने करायचा. तेव्हा महंमद अजहरूद्दीन, जडेजा असे सन्मान्य अपवाद वगळल्यास "फिल्डिंग'च्या आघाडीवर भारतीय क्रिकेटपटूंच्या बाबतीत "आनंद'च असायचा. जडेजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो मैदानावर वावरताना सतत हसतमुख असायचा!


​ ​

संबंधित बातम्या