भारतीय हॉकी संघाची विजयी मालिका कायम

वृत्तसंस्था
Wednesday, 2 October 2019

-  भारतीय हॉकी संघाने बेल्जियम दौऱ्यातील विजयी मालिका कायम ठेवताना तिसऱ्या कसोटीत बेल्जियमचा 2-1 असा पाडाव केला

- अमित रोहिदास (10) आणि सिमरनजित सिंग (52) यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.

मुंबई -  भारतीय हॉकी संघाने बेल्जियम दौऱ्यातील विजयी मालिका कायम ठेवताना तिसऱ्या कसोटीत बेल्जियमचा 2-1 असा पाडाव केला. याच दौऱ्यातील स्पेनविरुद्धच्या दोन्ही कसोटी भारताने जिंकल्या आहेत. 
भारताने जागतिक; तसेच युरोपीय विजेत्या बेल्जियमविरुद्ध पुन्हा वर्चस्व राखले. अमित रोहिदास (10) आणि सिमरनजित सिंग (52) यांनी प्रत्येकी एक गोल करीत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. तिसऱ्या सत्रात बेल्जियमने बरोबरीचा गोल केला होता. स्पेनविरुद्ध भारताने दोन कसोटीत अकरा गोल केले होते. 
बेल्जियमने आपल्या संघात काही प्रयोग केले असले, तरी भारताच्या विजयाचे महत्त्व कमी होत नाही. पहिल्याच पेनल्टी कॉर्नरवर झालेला गोल भारतासाठी मोलाचा आहे. बेल्जियमने चांगली प्रतिआक्रमणे करीत भारतीय बचावफळीचा विशेषतः गोलरक्षक पी. आर. श्रीजेशचा चांगलाच कस पाहिला. यजमानांचा भर प्रतिआक्रमणावर जास्त होता. भारताने गोलरक्षक बदलल्यावर बेल्जियमने मैदानाच्या मधल्या भागातून आक्रमणांचा वेग वाढवला; पण क्रिशन बी. पाठकनेही जगज्जेत्यांचे गोलचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. 
विश्रांतीनंतर बेल्जियमने बरोबरी साधल्यावर प्रतिस्पर्ध्यांचा भर चेंडूवरील वर्चस्वावर होता. बेल्जियमने प्रसंगी अचानक वेगवान चाली करीत भारतास धक्के देण्याचा प्रयत्न केला; पण अखेर योग्य संधीची प्रतीक्षा करण्याची भारताची चाल यशस्वी ठरली. भारताच्या गोलनंतर बेल्जियमचे रोखलेले दोन पेनल्टी कॉर्नर भारतास समाधान देणारे होते. 
 


​ ​

संबंधित बातम्या