World Cup 2019 : राहुल, धोनीची शतकं; भारताचा पहिला विजय

वृत्तसंस्था
Wednesday, 29 May 2019

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यानंतर विश्‍वकरंडकापूर्वी अखेरचा गृहपाठ करण्याची संधी भारतीय संघाने अचूक साधली. सलामीचे अपयश वगळता फलंदाजीला लय गवसली; तर नंतर गोलंदाजही सरसावले.

वर्ल्ड कप 2019 : कार्डिफ : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यानंतर विश्‍वकरंडकापूर्वी अखेरचा गृहपाठ करण्याची संधी भारतीय संघाने अचूक साधली. सलामीचे अपयश वगळता फलंदाजीला लय गवसली; तर नंतर गोलंदाजही सरसावले. प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीच्या शतकी खेळीने 7 बाद 359 धावा उभारल्यावर बांगलादेशला 264 धावांत गुंडाळून 95 धावांनी विजय मिळविला. 

आव्हानाचा पाठलाग करताना मधल्या फळीला आलेल्या अपयशाने बांगलादेश संघाने कच खाल्ली. लिटॉन दास (73) आणि मुशफिकूर रहिम (90) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या फिरकीसमोर त्यांची मधली फळी कोलमडली आणि भारताचा विजय सोपा झाला. 

तत्पूर्वी चौथ्या क्रमांकाचे काय होणार, हा गेल्या काही महिन्यांपासून सतावत असलेला प्रश्‍न अखेरच्या सराव सामन्यातून सुटला, पण त्याहून महत्वाचे महेंद्रसिंह धोनीची बॅट इंग्लंडमध्येही तळपली. धोनीसह के.एल. राहुल यांनी केलेल्या शतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात 7 बाद 359 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. 

दोन दिवसांवर आलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारताचा हा अखेरचा सराव सामना. ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्या सलामीवीरांनी पुन्हा अवसानघात केला. विराट कोहली बाद झाला तेव्हा 3 बाद 83 अशी अवस्था झाली होती. त्रिशतकी धावांचे लक्ष्य कठिण होते. पण केएल राहुल आणि धोनी यांच्या शतकांमुळे भारताने साडेतिनशे पल्याड मजल मारली. 

धोनीचा झंझावात 
राहुलचे शतक तंत्रशुद्ध फलंदाजीतून साकारलेले होते, धोनीनेही तेवढाच सहजसुंदर आक्रमकतेचा अविष्कार सादर केला. आयपीएलमध्ये ज्या तडफदारपणे धोनी षटकार-चौकारांची आक्रमकता दाखवत होता तेवढीच नेत्रदिपक पेरणी आज त्याने केली. आठ चौकार आणि सात षटकार हे त्याच्या आजच्या खेळीचे वैशिष्ठ होते. अवघ्या 78 चेंडूत त्याने 113 धावांची खेळी 144 च्या स्ट्राईक रेटने साकार केली. विशेष म्हणजे त्याचे काही षटकार क्रिजमध्ये उभे राहून थेट प्रेक्षकांमध्ये जात होते. धोनीच्या या तडाख्यामुळे भारताने अखेरच्या पाच षटकांत 15.80 च्या सरासरीने धावा कुटल्या. धोनी 22 व्या षटकांत मैदानात आला आणि तो अखेरच्या षटकापर्यंत मैदानात होता. या दरम्यान त्याने फलंदाजीला आलेख सतत उंचावतच नेला. समोर हार्दिक पंड्या असतानाही आज धोनीची फलंदाजी सरस होती. 

राहुलची नजाकत 
के. एल. राहुल आणि टीम इंडियासाठी हा अखेरचा सराव सामना महत्वाचा होता. फलंदाजीतील चौथा क्रमांक राहुलला द्यायचा हे जवळपास निश्‍चित झालेले आहे, फक्त राहुलने प्रतिसाद देणे आवश्‍यक होते. न्यूझीलंडविरूद्ध तो अपयशी ठरला होता, पण आज शिखर धवन, रोहित शर्मा यांच्यानंतर 47 धावा करणारा विराट कोहली बाद झाल्यानंतर राहुलने जबाबदारी तर घेतलीच पण धावांचा वेगही कायम ठेवला त्यामुळे भारताला त्रिशतकी धावा अवाक्‍यात आल्या होत्या. 
 


​ ​

संबंधित बातम्या