एवढं होऊनही विराटच कर्णधार कसा? : गावसकरांचा प्रश्न
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खालच्या दर्जाची कामगिरी होऊनही वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीची कर्णधारपदी फेरनियुक्ती केल्याबद्दल माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी राष्ट्रीय निवड समितीवर टीकेची झोड उठविली आहे.
नवी दिल्ली : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खालच्या दर्जाची कामगिरी होऊनही वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीची कर्णधारपदी फेरनियुक्ती केल्याबद्दल माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी राष्ट्रीय निवड समितीवर टीकेची झोड उठविली आहे.
विश्वकरंडकात उपांत्य फेरीत आव्हान आटोपल्यानंतर झटपट क्रिकेटसाठी विराट विश्रांती घेण्याची शक्यता होती, तसेच या प्रकारासाठी वेगळा कर्णधार नेमला जाईल अशी चर्चा होती. प्रत्यक्षात विराटने पूर्ण दौऱ्यात सहभागी व्हायचे ठरविले.
त्याच्याकडील नेतृत्वही कायम राहिले. या पार्श्वभूमीवर गावसकर यांनी एका दैनिकातील स्तंभात म्हटले आहे की, "संघाच्या कर्णधारपदी फेरनिवड करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने नेहमीच्या प्रक्रियेला फाटा दिला. याविषयी मी समाधानी नाही. त्यांनी विराटच्या स्थानाची चर्चाच केली नाही. आपल्या सर्वांच्या कल्पनेनुसार विराटची नियुक्ती विश्वकरंडकापर्यंत होती. त्यानंतर फेरनियुक्ती करण्यापूर्वी सदस्यांनी पाच मिनिटांसाठी का होईना त्यांनी विराटबाबात बैठक घ्यायला हवी होती, पण आधी कर्णधार निवडण्यासाठी त्यांनी बैठक घेतलीच नाही.
यावरून विराट त्याच्या की निवड समितीच्या मर्जीनुसार कर्णधार आहे आहे असा प्रश्न निर्माण होतो. फेरनिवड झाल्यानंतर कर्णधाराला बैठकीसाठी आमंत्रित केले जाते आणि त्याची मते जाणून घेतली जातात. 'भारताला अंतिम फेरी गाठण्यात अपयश येऊनही विराटला मोकळीक देण्यात आली आहे.'
संघनिवडीचा मुद्दा
स्पर्धेची तयारी करताना केदार जाधवला सातत्याने संधी मिळत होती, पण नंतर त्याला वगळण्यात आले. दुसरीकडे दिनेश कार्तिकला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आले नाही.
नवी समिती झुकणारी नसेल...
गावसकर यांनी कडक शब्दांत प्रसाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, "प्रसाद यांच्या समितीची मुदत लवकरच संपणार आहे. त्यामुळे सदस्य कणाहीन बनले आहेत. ही त्यांची कदाचित शेवटची संघनिवड असेल. आता नवी समिती लवकरच नियुक्त केली जाईल. त्यात न झुकणारे सदस्य असतील अशी आशा आहे. निवड समितीने निवडलेला संघ घेऊन खेळणे हे तुमचे काम आहे असे ते ठणकावून सांगू शकले पाहिजेत.