तीन नेमबाजांनी दवडली ऑलिंपिक पात्रतेची संधी

वृत्तसंस्था
Wednesday, 6 November 2019

- भारताच्या तीन नेमबाजांनी आशियाई स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रता मिळवण्याची संधी हुकवली.

- महिलांच्या ट्रॅप प्रकारात श्रेयासी सिंगची अंतिम फेरीची संधी; तसेच ऑलिंपिक पात्रतेसाठी प्रयत्न करण्याची संधी हुकली.

- कुमार नेमबाजांचा पदकवेध 

मुंबई -  भारताच्या तीन नेमबाजांनी आशियाई स्पर्धेद्वारे ऑलिंपिक पात्रता मिळवण्याची संधी हुकवली. ट्रॅप प्रकारात अंतिम फेरी गाठल्यावर क्‍यानन चेनाईला चार नेमबाजात तिसरे यायचे होते; तर 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये ऑलिंपिक पात्रतेसाठी अव्वल दहात येण्याची गरज असताना अनिष भानवाल अकरावा आला. 
दोहा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ट्रॅप प्रकारात अंतिम फेरी गाठलेल्या सहापैकी दोघांनी यापूर्वीच पात्रता मिळवली होती आणि तिघांना पात्रता मिळणार होती; त्यामुळे क्‍याननला सुवर्णसंधी होती. पण तो अंतिम फेरीतून बाद झालेला पहिला नेमबाज ठरला. पात्रतेत तो 122 गुणांसह दुसरा होता, पण त्याच्या अपयशामुळे कुवेत, तैवान आणि कतारचे नेमबाज पात्र ठरले. अर्थात क्‍यानन, मानवजीत आणि पृथ्वीराजने 357 गुणांसह सांघिक रौप्यपदक जिंकत काहीसा दिलासा दिला. 
पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तूलमध्ये अनिष भानवाल 574 गुणांसह पात्रतेत 11 वा आला. अखेरची फैरी खराब झाल्याचा त्याला फटका बसला. या स्पर्धेत पात्रतेत दहाव्या आलेल्या अनिषने पात्रता मिळवली. या प्रकारात जपान, कोरिया आणि पाकिस्तानच्या नेमबाजाने पात्रता मिळवली. अनिषने भावेश शेखावत आणि आदर्श सिंगसह 1716 गुण घेत भारतास सांघिक ब्रॉंझ जिंकून दिले. 
महिलांच्या ट्रॅप प्रकारात श्रेयासी सिंगची अंतिम फेरीची संधी; तसेच ऑलिंपिक पात्रतेसाठी प्रयत्न करण्याची संधी हुकली. ती संयुक्त सहावी होती; पण शूटऑफमधील खराब कामगिरीने तिची अंतिम फेरी हुकली. या प्रकारात पहिले सहा नेमबाज अंतिम फेरीस पात्र ठरतात. 
------------- 
कुमार नेमबाजांचा पदकवेध 
- 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात मुलांचे तसेच मुलींचे सांघिक सुवर्ण 
- नीरज कुमार, अबीद अली खान, हर्षराजसिंहजी गोहिल यांचा संघ 1845 गुणांसह अव्वल, चीनला मागे टाकले. 
- नीरजला (616.3) वैयक्तिक रौप्य; तर अबीदला (614.4) ब्रॉंझ 
- निश्‍चल, भक्ती खामकर, किन्नोरी कोनार या संघाचे सुवर्णपदक जिंकताना 1836.3 गुण. चीन कोरियापेक्षा सरस 
- निश्‍चलने (615.3) रौप्य; तर भक्तीने (614.4) ब्रॉंझ जिंकले. 
- दहा मीटर एअर रायफलच्या वरिष्ठ गटातील मिश्र दुहेरीत अंजुम मौदगिल - दीपक कुमार सहावे, तर अपूर्वी चंडेला - दिव्यांश सिंग पन्वर 18 वे. 


​ ​

संबंधित बातम्या