आशियाई ऍथलेटिक्‍स : भारतीय संघ दोहाला रवाना

नरेश शेळके
Thursday, 18 April 2019

येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ गुरुवारी दिल्ली येथून दोहाला रवाना झाला. दोहा येथील खलीफा स्टेडियममध्ये 21 ते 24 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भालाफेकपटू दविंदर सिंग कांग याची आश्‍चर्यकारकरीत्या भारतीय संघात निवड करण्यात आली.

नागपूर : येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी चाचणी असलेल्या 23व्या आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी 43 सदस्यीय भारतीय संघ गुरुवारी दिल्ली येथून दोहाला रवाना झाला. दोहा येथील खलीफा स्टेडियममध्ये 21 ते 24 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. भालाफेकपटू दविंदर सिंग कांग याची आश्‍चर्यकारकरीत्या भारतीय संघात निवड करण्यात आली. भालाफेकीतील ज्युनिअर विश्‍वविजेता, आशियाई व राष्ट्रकुल विजेता नीरज चोप्रा, आठशे मीटर शर्यतीतील आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मंजीत सिंग यांनी मात्र दुखापतीमुळे माघार घेतली आहे. 

लंडन विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या 30 वर्षीय दविंदर सिंगवर 2017 मध्येच तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. दीड महिन्यापूर्वी ही बंदी उठविण्यात आली. त्यानंतर दविंदरने पतियाळा येथे फेडरेशन करंडक आणि दोन दिवसांपूर्वी सोनिपत येथे राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत भाग घेतला. दोन्ही स्पर्धांत त्याला आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेसाठी भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने निश्‍चित केलेली 80.75 मीटरची पात्रता पार करण्यात अपयश आले. पतियाळा येथे पाचवे स्थान मिळविताना त्याने 79.31 मीटर अंतरावर भाला फेकला होता. तरीही त्याची निवड करण्याचे धाडस ऍथलेटिक्‍स महासंघाने केले. 

यापूर्वी भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने 51 सदस्यीय संघ जाहीर केला होता. मात्र, 13 एप्रिल रोजी झालेल्या निवड चाचणीनंतर हा संघ 43 ऍथलिट्‌सचा करण्यात आला. मंजीत सिंगच्या अनुपस्थितीत केरळच्या महम्मद अफझलला स्थान देण्यात आले. महिलांच्या रिले शर्यतीत पी. टी. उषाची शिष्या जिस्ना मॅथ्यूऐवजी प्राची शेरावतला संधी देण्यात आली आहे. प्राची मिश्र रिलेतही भाग घेणार आहे. पुरुषांच्या चारशे मीटर हर्डल्स शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर धारुन अय्यास्वामीनेही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. स्टीपलचेसमधील माजी आशियाई विजेती सुधा सिंगविषयी संभ्रम कायम असून, क्रीडा मंत्रालयाने हिरवी झेंडी दाखविल्यावरच तिचा प्रवेश निश्‍चित होईल. चाचणीनंतर महिलांच्या 4-100 मीटर रिले संघाला पाठविण्याचा निर्णय झाला असला, तरी पुरुष संघाला वगळण्यात आले. 

भारतीय संघ : (पुरुष) : आरोक्‍य राजीव, महम्मद अनस, कुन्हू महम्मद, के. एस. जीवन, जितू बेबी, ऍलेक्‍स ऍन्थोनी, जिन्सॉन जॉन्सन, महम्मद अफझल, अजय कुमार सरोज, अभिषेक पाल, मुरली गावीत, अविनाश साबळे, शंकरलाल स्वामी, महम्मद जबीर, ताजींदरपाल सिंग तूर, शिवपाल सिंग, दविंदर सिंग कांग, प्रवीण चित्रावेल. 
महिला ः द्युती चंद, अर्चना, के. रंगा, हीना, रेवती, हिमा दास, एम. आर. पुवम्मा, के. गोमती, ट्विंकल चौधरी, पी. यू. चित्रा, लिली दास, संजीवनी जाधव, सरिताबेन गायकवाड, प्राची शेरावत, के. विस्मय्या, सोनिया बशय्या, पारुल चौधरी, एम. अर्पिता, अनू राणी, कुमारी शर्मीला, कमलप्रीत, नवजीत कौर, स्वप्ना बर्मन, पुर्णिमा हेम्ब्रम, सुधा सिंग (मंत्रालयाच्या परवानगीनंतर). 

संजीवनीला संधी 
काही महिन्यांपूर्वी उत्तेजक सेवनात अडकलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधवचा प्रवेश राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेकडून (नाडा) मिळणाऱ्या हिरव्या झेंडीवर अवलंबून होता. नाडाने हिरवी झेंडी दाखविल्याने तिचा दोहातील सहभाग निश्‍चित झाला. ती पाच आणि दहा हजार मीटर शर्यतीत भाग घेणार असून, दोन्ही शर्यतींत तिला पदकाची संधी आहे. पाच हजार मीटरमध्ये 12 तर दहा हजार मीटर शर्यतीत 11 धावपटूंचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी भुवनेश्‍वर येथील स्पर्धेत संजीवनीने पाच हजार मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक जिंकले होते.


​ ​

संबंधित बातम्या