महिला हॉकी संघाची ब्रिटन मालिका बरोबरीत

वृत्तसंस्था
Friday, 4 October 2019

- पहिली कसोटी जिंकून जोरदार सुरवात केलेल्या भारतीय महिला हॉकी संघास ब्रिटनमधील मालिका बरोबरीत सोडवण्यावर समाधान मानावे लागले.

- मालिकेतील पाचवी आणि अखेरची कसोटी 2-2 बरोबरीत सुटली.

- अखेरच्या पाच मिनिटांत दोन गोल स्वीकारल्याने भारतास अखेरच्या कसोटीत तसेच मालिकेत बरोबरी स्वीकारावी लागली

मुंबई - पहिली कसोटी जिंकून जोरदार सुरवात केलेल्या भारतीय महिला हॉकी संघास ब्रिटनमधील मालिका बरोबरीत सोडवण्यावर समाधान मानावे लागले. या मालिकेतील पाचवी आणि अखेरची कसोटी 2-2 बरोबरीत सुटली. मार्लो (इंग्लंड) येथील या मालिकेत भारताने एक कसोटी जिंकली आणि एक गमावली, तर उर्वरित तीन कसोटी बरोबरीत सुटल्या. 
नवज्योत कौरने 8 व्या आणि गुरजीत कौरने 48 व्या मिनिटास गोल करीत भारतास 2-0 आघाडीवर नेले होते, पण अखेरच्या पाच मिनिटांत दोन गोल स्वीकारल्याने भारतास अखेरच्या कसोटीत तसेच मालिकेत बरोबरी स्वीकारावी लागली. चौथी कसोटी गमावलेल्या भारताने आक्रमक सुरवात करीत ब्रिटनला धक्का दिला होता. पहिल्या दहा मिनिटांत ब्रिटनला एकही आश्‍वासक चाल रचता आली नाही, त्यावरून भारताचे वर्चस्व स्पष्ट होईल. 
पहिल्या सत्रात भारतीयांनीच गोलच्या संधी निर्माण केल्या, पण त्यापैकी एकाचेच गोलात रूपांतर केले. ब्रिटनने दुसऱ्या सत्रात तीन पेनल्टी कॉर्नर मिळवत प्रतिआक्रमणाची तयारी दाखवली. सविताच्या भक्कम गोलरक्षणामुळे विश्रांतीस भारताने आघाडी राखली. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारतीय आक्रमक जोषात आल्या होत्या. तोच जोष तिसऱ्या सत्रातही कायम राहिला, पण ब्रिटनची प्रतिआक्रमणे प्रभावी होती. चौथ्या सत्राच्या सुरवातीस भारताने आघाडी वाढवली, पण त्यापासून ब्रिटनने जास्त प्रेरणा घेतली. अखेरच्या मिनिटात गोल स्वीकारण्याचे भारताचे दुखणे उफाळून आले आणि लढत बरोबरीत सुटली. 
 


​ ​

संबंधित बातम्या