IPL नंतर एबी T20 वर्ल्डकपही खेळणार?; बाउचर यांनी दिले संकेत

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 16 April 2021

तो आताही आपल्या जुन्या अंदाजात फटकेबाजी करु शकतो. आयपीएलमध्ये तू तुझी भूमिका पार पाड, असे एबीला म्हटल्याचेही त्यांनी सांगितले.  

भारतातील मैदानात रंगणाऱ्या टी 20 वर्ल्ड (T20 world cup)  कपसंदर्भात दक्षिण आफ्रिकेचे कोच मार्क बाउचर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जर एबी डिव्हिलियर्स (AB Devilliers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा खेळण्यास तयार असेल तर त्याच्यासाठी दरवाजे खुले आहेत. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी प्रत्येक टीम तयारीला लागली आहे. याच वेळी बाउचर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघातून एबी पुन्हा आंतरराष्ट्रीय मैदानात उतरण्याची चर्चा सुरु झाली आहे. सध्याच्या घडीला एबी डिव्हिलियर्स विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (Royal Challengers Bangalore) खेळत आहे. मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.  

बाउचर (mark boucher)  म्हणाले की, आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) जाण्यापूर्वी एबीशी चर्चा केली होती. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुन तो आपल्यातील क्षमता दाखवण्यास उत्सुक आहे. आपल्यात क्रिकेट अजूनही आहे हेच त्याला आयपीएल स्पर्धेतून दाखवू द्यायचे आहे. तो आताही आपल्या जुन्या अंदाजात फटकेबाजी करु शकतो. आयपीएलमध्ये तू तुझी भूमिका पार पाड, असे एबीला म्हटल्याचेही त्यांनी सांगितले.  

BCCIच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नटराजन का नाही; जाणून घ्या कारण

2018 मध्ये एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्तीनंतर त्याने वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे (South Africa Cricket Team) प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. संघाकडून पुन्हा आंतरराष्ट्रीय मैदानात उतरण्यास तयार आहे, असे तो म्हणाला होता. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये एबी दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसेल, अशी चर्चाही त्यावेळी रंगली.  पण यावेळी दक्षिण आफ्रिका बोर्डाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. निवृत्तीनंतर जगभरात टी-20 स्पर्धेत तो खेळतच राहिला. 

विराट, रोहित, बुमराहला वर्षाला सात कोटींचे पॅकेज;जाणून घ्या कुणाला किती पैसे मिळणार 

जर डिव्हिलियर्स पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून खेळताना दिसला तर त्याचा निश्चितच संघाला फायदा होईल. टी 20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. आयपीएलमुळे एबीला भारतीय मैदानात खेळण्याचा अनुभव आहे. तो अजूनही आपल्या जुन्या तोऱ्यात खेळताना दिसतोय. दुसरीकडे घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पाकिस्तानकडून टी-20 मालिकेत पराभूत व्हावे लागले होते. ही सर्व समिकरणे एबीच्या आंतराष्ट्री कमबॅकची चाहूल देणारी आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या