दिल्ली स्टेडियममधूनच सुरू होती सट्टेबाजी

पीटीआय
Thursday, 6 May 2021

कोरोनापासून सुरक्षा असावी म्हणून कडेकोट सुरक्षा असलेल्या जैवसुरक्षा वातावरणात आयपीएल सुरू होती, परंतु दिल्लीत बनावट ओळखपत्र तयार करून सट्टेबाज स्टेडियममध्ये बसून सट्टेबाजी करत असल्याचे उघड झाले.

नवी दिल्ली - कोरोनापासून सुरक्षा असावी म्हणून कडेकोट सुरक्षा असलेल्या जैवसुरक्षा वातावरणात आयपीएल सुरू होती, परंतु दिल्लीत बनावट ओळखपत्र तयार करून सट्टेबाज स्टेडियममध्ये बसून सट्टेबाजी करत असल्याचे उघड झाले. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख शब्बीर हुसैन शेखादम यांनीच ही माहिती उघड केली.

कोरोनाच्या विषाणूने आता खेळाडूंमध्येच शिरकाव केल्यामुळे बहुचर्चित आयपीएल मध्यावरच स्थगित करण्याशिवाय बीसीसीआयकडे पर्याय राहिला नाही, पण फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या काही सामन्यांत ‘पिच सायडिंग’ हा प्रकार सुरू होता. सट्टेबाजीचा हा नवा प्रकार असल्याचे शेखादम यांनी सांगितले. याला ‘कोर्ट सायडिंग’ असेही संबोधले जाते. जुगार किंवा थेट बेटिंग करण्यासाठी हा प्रकार अवलंबला जातो असे ते म्हणाले.

भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या आमच्या एका अधिकाऱ्याने स्टेडियममघ्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला पकडले. त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले असून दिल्ली पोलिसांत तक्रार करून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती शेखादम यांनी दिली. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. 

एकीकडे आम्ही स्टेडियमध्ये असलेल्या व्यक्तीला पकडले, त्याच वेळी दिल्ली पोलिसांनी राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात २ मे रोजी झालेल्या सामन्याच्या वेळी बनावट ओळखपत्रे असलेल्या दोघा व्यक्तींना ताब्यात घेतल्याचे शेखादम म्हणाले.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता
या व्यक्ती आलटूनपालटून सामन्याच्या वेळी स्टेडियममध्ये उपस्थित असायच्या. त्यांचे आधार कार्डही दिल्ली पोलिसांकडे देण्यात आले आहे. आम्ही पकडलेली व्यक्ती एक मोहरा असू शकेल. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे, असे शेखादम यांनी सांगितले.

पिच सायडिंग म्हणजे काय?
प्रत्यक्ष चेंडू टाकला जातो तो क्षण आणि दूरचित्रवाणीवर ते दृष्य दिसण्यास साधारणतः १४ ते १७ सेकंदांचा वेळ लागतो. सॅटेलाईवरून ही प्रतिमा येत असते. अशा वेळी मैदानावर उपस्थित असलेल्यांना घटना लवकर कळत असल्याने ते त्याच क्षणी बेटिंगसाठ माहिती पुरवतात.

कसा सुगावा लागला
1 एक व्यक्ती कोटला स्टेडियममध्ये उभी होती. त्या व्यक्तीला आम्ही तू येथे काय करतोस असे विचारले. तेव्हा त्याने मी माझ्या मैत्रिणीशी बोलत असल्याचे सांगितले. 
2 ज्या क्रमांकावर बोलत होतास तोच क्रमांक पुन्हा डायल कर असे आमच्या अधिकाऱ्याने सांगताच त्या व्यक्तीने पळ काढण्यास सुरुवात केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीकडे आयपीएलचे ओळखपत्र होते. 
3 चतुर्थ श्रेणीचे हे ओळखपत्र होते अशी ओळखपत्रे बसचालक, स्वच्छता कर्मचारी यांना दिली जातात. त्याच्याकडे दोन मोबाईल कसे, असा प्रश्न आम्हाला पडल्यावर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवले असे शेखादम यांनी सांगितले.

मुंबईतील हॉटेलमधून तिघा सट्टेबाजांना अटक
मुंबई - राजस्थान रॉयल्स संघाचा मुक्काम असलेल्या मुंबईतील हॉटेलमधून बेटिंग सिंडिकेट चालवत असलेल्या तिघा सट्टेबाजांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने दिलेल्या माहितीवरून परवेश बाफना, आयुष्य केसरकर आणि चेतन सालेचा यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आठ मोबाईल, लॅपटॉप, ९७ हजार रुपये तसेच एक कार जप्त करण्यात आली. 

सट्टेबाजांचा मुक्काम राजस्थान रॉयल्स संघ रहात असलेल्या हॉटेलमध्ये होता, पण या सट्टेबाजांना खेळाडू अथवा संघाशाी संपर्क साधता आला नाही, असे सांगण्यात आले.  हे तीनही सट्टेबाज राजस्थानमधील आहेत. यापैकी दोघांनी यापूर्वीही स्थानिक स्पर्धेतील खेळाडूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. 

अहमदाबादमध्येही सट्टेबाज अटकेत
भारतीय क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने दिलेल्या माहितीवरून अहमदाबादमध्येही सट्टेबाज ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र सट्टेबाजांनी संपर्क साधल्याची तक्रार एकाही खेळाडूने केलेली नाही, अशीही माहीती देण्यात आली.


​ ​

संबंधित बातम्या