IPL मध्ये 7 वर्षानंतर चान्स मिळाल्यावर पुजाराने बदलला स्टान्स
तसेच त्याने सरावात प्रामुख्याने चेंडू उंचावरुन फटकावण्याचा सराव केला आहे.
मुंबई : कसोटी क्रिकेटमधीलच भरवशाचा फलंदाज असलेला चेतेश्वर पुजारा आयपीएलच्या आव्हानासाठी तयार आहे. भक्कम बचावासाठी प्रसिद्ध असलेला पुजाराने ट्वेंटी 20 च्या आक्रमक फलंदाजीसाठी आपला स्टान्स बदलला आहे. सात वर्षे आयपीएलमध्ये पुजाराला कोणीही खरेदी केले नव्हते, पण यंदा त्याला चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले आहे. पुजाराच्या सरावाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर लोकप्रिय होत आहे. त्यात पुजारा हायर बॅकलिफ्ट घेऊन फलंदाजीसाठी उभा रहात आहे. तसेच त्याने सरावात प्रामुख्याने चेंडू उंचावरुन फटकावण्याचा सराव केला आहे. पुजारा भारताकडून एकही ट्वेंटी 20 लढत खेळलेला नाही. चेन्नईचा संघ सध्या मुंबईत सराव करतोय. धोनी रैना आणि अन्य फलंदाजांसह पुजाराही सरावादरम्यान लक्षवेधी ठरताना दिसतोय.
अजिंक्य रहाणेचा मुंबईत सराव सुरू
दुसरीकडे सात दिवसांचे विलगीकरण पूर्ण केल्यानंतर दिल्ली कॅपिटल संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आजपासून मुंबईत सराव सुरू केला. या आयपीएलमध्ये दिल्लीचे सुरुवातीचे सामने मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर रहाणे विश्रांती घेत आहे. इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना ६ मार्च रोजी संपला होता. 20 दिवसांनंतर मी आज फलंदाजी केली. गेले सात दिवस विलगीकरणात होतो, त्यामुळे लय मिळवण्यासाठी आज मी सरावात प्रयत्न केला. आयपीएल जसजशी जवळ येईल तोपर्यंत फॉर्म मिळवायचा आहे, असे रहाणेने सांगितले. रहाणेबरोबर दिल्ली संघाचा लेगस्पीनर अमित मिश्रानेही फलंदाजीच्या सरावावर मेहनत घेतली.
आम्ही सर्व जण सज्ज झालो आहोत, संघातील नवोदित अधिक मेहनत घेत आहेत, असे 38 वर्षीय अमित मिश्रा म्हणाला. प्रशिक्षकांनी मला फलंदाजीवरही लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत, सामन्यामध्ये तळाच्या फलंदाजांकडून कधीही गरज लागली तर आपण सज्ज असावे यासाठी मीसुद्धा तयारी करत आहे, असे मिश्राने सांगितले.