आयपीएलवर कोरोनाचे ढग, स्पर्धा होणार का?

Thursday, 8 April 2021

IPL 2021 : लढती होणार असलेल्या शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. या परिस्थितीत लीग पूर्ण होईल का हा प्रश्न काही फ्रँचाईजना सतावत आहे.

IPL 2021 : मुंबई/ नवी दिल्ली ः आयपीएलचे चौदावे पर्व सुरू होण्यास जेमतेम ४८ तास असताना या ट्वेंटी २० क्रिकेट लीगवरील कोरोनाचे ढग अधिक गडद होत आहेत. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांत सातत्याने आयपीएलशी संबंधित व्यक्तींची भर पडत आहे. लढती होणार असलेल्या शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. या परिस्थितीत लीग पूर्ण होईल का हा प्रश्न काही फ्रँचाईजना सतावत आहे. मुंबई तसेच परिसरातील कोरोना रुग्ण वाढत आहेत तसेच हीच परिस्थिती चेन्नईतही आहे. त्यामुळे लीग पू्र्ण होईल का अशी धास्ती व्यक्त होत आहे. लीग जैवसुरक्षा वातावरणात होणार आहे, पण देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. भारतीय मंडळाने अद्याप काहीही कळवलेले नाही, पण लीग मध्यावरती थांबवण्यात येईल अशी धास्ती वाटत असल्याचे एका फ्रँचाईजमधील वरिष्ठ आधिकाऱ्याने सांगितले.

स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहे. या परिस्थितीत लीग सहा शहरांत घेण्याची गरजच काय होती. लीग एका शहरात घेऊनही उद्दिष्ट साध्य झाले असते. मला तर लीग पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुरू होणार का याचीही चिंता वाटते, असे चेन्नईत मुक्काम असलेल्या एका संघाच्या आधिकाऱ्याने सांगितले.

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती चिंताजनक आहे. आम्ही परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व खेळाडू, संघ, पंच, सामनाधिकारी, यांसह सर्व संबंधितांना जैवसुरक्षा नियमांचे कसोशीने पालन करण्याची सूचना केली आहे, असे भारतीय क्रिकेट मंडळातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मोरे बाधित झाल्याने चिंता
मुंबई इंडियन्स संघासोबतच्या किरण मोरे यांना बाधा झाल्याने फ्रँचाईजची चिंता वाढली आहे. हा संघ १ मार्चपासून विलगीकरणात आहे. त्यांनी पंचतारांकित हॉटेलची पूर्ण एक विंग आरक्षित केली आहे. त्यानंतरही मोरे बाधित होत असतील, तर... अशी चिंता व्यक्त करताना एका फ्रँचाईजच्या आधिकाऱ्याने रोजच्या चाचणीला पर्याय नाही अशी टिप्पणी केली.

दिल्लीची खबरदारी
आयपीएलचा पहिला सामना चेन्नईत होणार आहे. तिथे गेल्या काही दिवसांत रोज चार हजाराच्या आसपास रुग्ण आढळत आहेत; तर मुंबईतील सामने रविवारी सुररू होणार आहेत. तेथील रुग्ण रोज सरासरी १० हजार आहेत. लीगच्या पहिल्या टप्प्यात चेन्नई तसेच मुंबईत प्रत्येकी चार संघांचा मुक्काम आहे. मुंबईतील ग्राऊंडस््मन बाधित आढळल्यामुळे दिल्लीने मैदानावरील सर्व कर्मचाऱ्यांची स्टेडियम परिसरात १० एप्रिलपासून व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. तेथील लढती २८ एप्रिलपासून आहेत.

स्पर्धा संयोजनातील त्रुटी

  • परदेशी खेळाडूंच्या व्हिसाची प्रक्रिया उशिरा सुरू
  • अमिरातीत स्पर्धा घेताना खासगी संस्थेची मदत, या वेळी हे टाळले
  • अमिरातीतील स्पर्धेप्रमाणे जीपीएस ट्रॅकिंगची मदत नाही
  • संघाच्या मुक्कामाची हॉटेल निवडताना समन्वयाचा अभाव.
  • मुंबईत सध्या मुक्काम असलेल्या एका संघाचे हॉटेल स्टेडियमपासून १० कि.मी. दूर
  • संघ हॉटेलमध्ये दाखल होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या विलगीकरणाबाबत प्रश्न
     

​ ​

संबंधित बातम्या