पराभवानंतर गोलंदाजांना खडसावलं, वाचा काय म्हणाला धोनी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 April 2021

IPL 2021 : दिल्ली संघानं धोनीच्या चेन्नई संघाचा सात गड्यांनी पराभव केला

IPL 2021 : आयपीएलच्या १४ व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात धोनीच्या चेन्नई संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई येथील वानखेडे येथे झालेल्या सामन्यात पंतच्या दिल्ली संघानं धोनीच्या चेन्नई संघाचा सात गड्यांनी पराभव केला.  शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या तुफानी फलंदाजीपुढे चेन्नईची तगडी गोलंदाजी अतिशय कमकुवत दिसत होती. पहिल्या सामन्यातील पराभवाचं खापर धोनीनं गोलंदाजावर फोडलं आहे. सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, गोलंदाजी अचूक टप्यावर झाली नाही. त्यामुळेच पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. 

सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, 'आमच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स मिळवता आल्या नाहीत. यापुढे ही चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पहिल्या सामन्यात झालेल्या चुकांमधून गोलंदाजांनी शिकायला हवं, एवढ्या मोजक्या शब्दात धोनीने गोलंदाजांना खडेबोल सुनावले.'

दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईचे सरसकट सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. शार्दुल ठाकूरला दोन विकेट्स मिळाल्या परंतु त्याने 3.4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या. ब्राव्होने 4 षटकात 28 धावा देत 1 विकेट मिळवली. उर्वरीत कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ब्राव्होव्यतिरिक्त चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.

सामन्यानंतर पंत काय म्हणाला?
कर्णधार म्हणून पहिला विजय मिळवल्यानंतर पंतची समालोचक हर्षा भोगले यांनी छोटेखानी मुलाखत घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. धोनीसोबत नाणेफेकीसाठी मैदानावर आल्यानंतर स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं का? यावर दिलेल्या उत्तरानं पंतनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. पंत म्हणाला की, 'माझ्यासाठी हा सुवर्णक्षण होता. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून माझा पहिलाच सामना होता. अन् नाणेफेकीसाठी समोर एम एस धोनी होता. क्रिकेट करिअरमध्ये धोनीकडून खूप काही शिकलो आहे. काही अडचण असते तेव्हा मी धोनीची मदत घेत असतो. धोनी मला सतत मार्गदर्शन करत असतो. धोनी माझा गो टू मॅन आहे. माझ्यासाठी हे एक स्वप्नच होतं. ' 

आयपीएल 2021 च्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी अतुलनीय कामगिरी केली. सामनावीर ठरलेल्या धवनने 54 चेंडूत 85 धावा केल्या; तर शॉने केवळ 38 चेंडूत 72 धावा कुटल्या. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 81 चेंडूत 138 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या विस्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला सात गडी राखून सहज पराभूत केले.


​ ​

संबंधित बातम्या