धोनीचा पराभव केल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला.....

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 April 2021

IPL 2021 : पंतच्या दिल्ली संघानं धोनीच्या चेन्नई संघाचा सात गड्यांनी पराभव केला.

IPL 2021 : आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली असून आपल्या पहिल्या सामन्यात पंतच्या दिल्ली संघानं धोनीच्या चेन्नई संघाचा सात गड्यांनी पराभव केला. मुंबई येथील वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर दिल्लीनं बाजी मारली. शिखर-पृथ्वीनं पाया रचल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत यानं विजयी चौकार लगावला. शिष्य पंत यानं गुरु धोनीचा पराभव केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. सामन्यानंतर पंतला धोनीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी पंतनं दिलेल्या उत्तरानं सर्वांचं मनं जिंकली आहे. सोशल मीडियावर ऋषभ पंतवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आयपीएलनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. 

कर्णधार म्हणून पहिला विजय मिळवल्यानंतर पंतची समालोचक हर्षा भोगले यांनी छोटेखानी मुलाखत घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. धोनीसोबत नाणेफेकीसाठी मैदानावर आल्यानंतर स्वप्न साकार झाल्यासारखं वाटलं का? यावर दिलेल्या उत्तरानं पंतनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. पंत म्हणाला की, 'माझ्यासाठी हा सुवर्णक्षण होता. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून माझा पहिलाच सामना होता. अन् नाणेफेकीसाठी समोर एम एस धोनी होता. क्रिकेट करिअरमध्ये धोनीकडून खूप काही शिकलो आहे. काही अडचण असते तेव्हा मी धोनीची मदत घेत असतो. धोनी मला सतत मार्गदर्शन करत असतो. धोनी माझा गो टू मॅन आहे. माझ्यासाठी हे एक स्वप्नच होतं. "

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत यानं आपल्या विजयाचं श्रेय वेगवान गोलंदाजांना दिलं. तो म्हणाला की, 'विजय मिळवण्याचा आनंद काही औरच असतो. सामन्यात मी प्रेशरमध्ये आलो होतो. पण आवेश आणि टॉम करन यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत १८८ धावांवर रोखलं.'

आयपीएल 2021 च्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी अतुलनीय कामगिरी केली. सामनावीर ठरलेल्या धवनने 54 चेंडूत 85 धावा केल्या; तर शॉने केवळ 38 चेंडूत 72 धावा कुटल्या. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 81 चेंडूत 138 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या विस्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला सात गडी राखून सहज पराभूत केले.
 

 


​ ​

संबंधित बातम्या