IPL2021 : KKR चा संघ SRH एवढाच ताकदवान; पण...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 April 2021

कोलकाताचा संघ नेहमीच संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असतो, परंतु काही सामन्यांतील चुका त्यांना बॅकफूटवर टाकत असतात. आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि अर्थात पॅट कमिन्स हे त्याचे हुकमी परदेशी खेळाडू आहेत.

चेन्नई : ट्वेन्टी-२० चे स्पेशालिस्ट परदेशी खेळाडू असलेल्या हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात यंदाच्या आयपीएलमधील मोहीमेसा एकमेकांविरुद्धच्या लढतीने सुरूवात होणार  आहे. कोणत्या चार परदेशी खेळाडूंना अंतिम संघात स्थान द्यायचे यासाठी दोन्ही संघांना कसरत करावी लागेल. अमिरातीत गतवेळेस झालेल्या स्पर्धेत हैदराबादने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते; तर कोलकाताची ही संधी थोडक्यात हुकली होती. यंदा मात्र ते सुरुवातीपासून दक्षता घेतील आणि त्याची सुरुवात उद्याच्या त्यांच्या सलामीच्या सामन्यातून करतील. इयॉन  मॉर्गनच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ हैदराबाद एवढाच ताकदवान आहे. मॉर्गन गेल्या महिन्यापासून भारतातच आहे. भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने इंग्लंडचे नेतृत्व केले होते, त्यामुळे येथील परिस्थितीचा त्यांना चांगला अनुभव आलेला आहे.

शकीब की फॉर्ग्युसन?

कोलकाताचा संघ नेहमीच संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असतो, परंतु काही सामन्यांतील चुका त्यांना बॅकफूटवर टाकत असतात. आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि अर्थात पॅट कमिन्स हे त्याचे हुकमी परदेशी खेळाडू आहेत. चौथ्या स्थानासाठी लॉकी फर्ग्युसन आणि शकीब अल हसन यांच्यात चुरस असेल. चेंडू थांबून येणाऱ्या चेन्नईच्या खेळपट्टीवर शकीबची फिरकी आणि त्याची फलंदाजीची क्षमता कोलकातासाठी फायदेशीर ठरू शकते.

CSK vs DC : जडेजाने कॉ़ल करुन रैनाला रन आउट केलं, पाहा नेमकं काय झालं (VIDEO)

गोलंदाजीही सक्षम

पॅट कमिन्स आघाडीचा गोलंदाज असलेल्या कोलकाताकडे प्रसिद्ध कृष्णा, शुभम मावी, कमलेश नागरकोटी, असे वेगवान गोलंदाज आहेत; तर सुनील नारायणवर फिरकीची मदार असेल. प्रथमच त्यांच्या संघात असलेल्या हरभनजला स्थान मिळते की नाही हे पहावे लागेल.

शुभमन गिलवर लक्ष
भारतीय संघात स्थिरावत असला तरी शुभमन गिलला आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी त्याच्यासाठी यंदाची ही आयपीएल फायदेशीर ठरू शकते, त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर लक्ष असेल. नितीश राणा हा त्यांच्यासाठी आणखी एक भरवशाचा फलंदाज असेल.
 


​ ​

संबंधित बातम्या