आयपीएलसाठी फ्रँचाईज आग्रही

पीटीआय
Tuesday, 4 May 2021

आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेटमधील दोन खेळाडू कोरोनाबाधित झाल्यामुळे परदेशी खेळाडूंची चिंता वाढली आहे; पण त्याच वेळी आयपीएल फ्रँचाईज स्पर्धा कायम ठेवण्यासाठी आग्रही आहेत.

नवी दिल्ली - आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेटमधील दोन खेळाडू कोरोनाबाधित झाल्यामुळे परदेशी खेळाडूंची चिंता वाढली आहे; पण त्याच वेळी आयपीएल फ्रँचाईज स्पर्धा कायम ठेवण्यासाठी आग्रही आहेत. स्पर्धा किती दिवस लांबवणार, या प्रश्नास काहीच उत्तर नसल्याने सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा कायम ठेवणे योग्य होईल, असाच सूर आहे.

खेळाडू वैद्यकीय चाचणीसाठी बाहेर पडला, त्या वेळी त्यास कोरोनाची लागण झाली, याचाच अर्थ जैवसुरक्षित वातावरणात कोणत्याही त्रुटी नाहीत, असे एका फ्रँचाईजमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी परदेशी खेळाडूंची चिंता जास्त वाढली असल्याचे मान्य केले.

जवळपास अर्धी स्पर्धा झाली आहे. नव्या प्रश्नामुळे संयोजन जास्त आव्हानात्मक झाले आहे. आता समजा स्पर्धा थांबवण्याचे ठरवले, तर किती थांबवणार, हाही प्रश्नच आहे. कोरोनाबाधितांना दूर करून, सध्या निगेटिव्ह असलेल्यांची चाचणी घेत स्पर्धा सुरू ठेवणे योग्य होईल, असे अन्य एका फ्रँचाईजच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

आम्हाला काय वाटते, हा प्रश्न असला, तरी स्पर्धेचे आता काय, हे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विचारून त्यांच्यावरील दबाव वाढवणे अयोग्य होईल. मुंबई इंडियन्स संघाने काही दिवसांपासून संघातील सर्वांची रोज चाचणी करण्यास सुरुवात केली आहे, आता अन्य संघही हाच विचार करीत आहेत. सद्यपरिस्थितीत जास्त गडबड-गोंधळ न करता त्यास सामोरे जाणे योग्य होईल, याकडेही एका अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. 

रूमबाहेर न पडण्याची सर्वांना सूचना
दरम्यान, सर्व फ्रँचाईजनी आता आपल्या संघातील सर्व सदस्यांना रूममध्येच थांबण्याची सूचना केली आहे. पुढील सूचनेची प्रतीक्षा करा, असेही सांगितल्याचे समजते. सध्या बाहेरील वातावरणापेक्षा आयपीएलमधील जैवसुरक्षा वातावरण जास्त सुरक्षित आहे, याची संघातील प्रत्येक सदस्यास पूर्ण कल्पना आहे. सध्या देशातील परिस्थिती पाहता प्रत्येकास आपले काय, ही चिंता भेडसावत आहे, खेळाडूही यापासून वेगळे कसे असतील, अशी विचारणा एका खेळाडूने केली; मात्र त्याच वेळी केवळ घाबरून काही होत नाही; आहे त्या परिस्थितीला सामोरे जायला हवे, असेही त्याने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या