आयपीएलमधील जैवसुरक्षा वातावरण कसे भेदले; गांगुलींचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 May 2021

सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात असताना कोरोना विषाणूने आयपीएलमध्ये कसा प्रवास केला याचे पोस्टमार्टेम आम्ही करणार आहोच, पण दोन शहरांमधील प्रवास यामुळे जैवसुरक्षा वातावरण भेदण्यास कारणीभूत ठरला असावा, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली - सुरक्षेची सर्व काळजी घेतली जात असताना कोरोना विषाणूने आयपीएलमध्ये कसा प्रवास केला याचे पोस्टमार्टेम आम्ही करणार आहोच, पण दोन शहरांमधील प्रवास यामुळे जैवसुरक्षा वातावरण भेदण्यास कारणीभूत ठरला असावा, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले. ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अगोदर उर्वरित आयपीएल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही गांगुली यांनी सांगितले.

जैवसुरक्षा वातावरणाची एवढी कडेकोट व्यवस्था असताना एकेक खेळाडू कोरोनाबाधित कसे व्हायला लागले. त्याचे निश्चित कारण आम्ही शोधणार आहोत. कदाचित दोन शहरांमधील प्रवास यास कारणीभूत ठरला असावा, असा अंदाज गांगुली यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे.

गतवेळेस अमिरातीत झालेली आयपीएल दुबई-अबुधाबी-शारजा या तीन शहरातच झाली होती. या तीन शहरांत प्रवास करताना विमानप्रवास नव्हता, भारतातील ही आयपीएल सहा वेगवेगळ्या शहरांत होत होती. एका शहरात काही सामने खेळल्यानंतर तो संघ दुसऱ्या शहरात विमानाने प्रवास करत होता.

या मुलाखतीत गांगुली पुढे म्हणतात, देशातील कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. दररोज इतके लोक बाधित होत आहेत ही आकडेवारी फारच चिंता करणारी आहे, उद्या काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या हातून परिस्थिती निसटली आहे.

मुंबईचा प्रस्ताव होता
मुंबईत तीन आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत, त्यामुळे संपूर्ण आयपीएल मुंबईत खेळवण्याचा प्रस्ताव होता, परंतु ज्या वेळी आम्ही आयपीएलचे नियोजन नक्की केले त्या वेळी देशात कोरोना रुग्णांची संख्या फारच कमी होती आणि जेव्हा स्पर्धा मुंबईत सुरू झाली तेव्हा मुंबईतील आकडेवारी झपाट्याने वाढत होती, सुदैवाने त्या वेळी कोणी बाधित झाले नाही, असे गांगुली यांनी म्हटले आहे.

यंदाची ही आयपीएल बरोबर मध्यावर स्थगित करावी लागली आहे, उर्वरित स्पर्धा होऊ शकली नाही तर सुमारे २५०० कोटी रुपयांचा फटका बसेल, असे गांगुली यांनी स्पष्ट केले. त्यासाठी विश्वकरंडक स्पर्धेच्या अगोदर ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असेल. सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यानंतरचे काही दिवस मिळणार आहे, परंतु त्यासाठी कार्यक्रमात बदल करावे लागणार आहे. इतर देशांतील खेळाडूंचीही उपलब्धता तपासली जाईल. पुढे जाऊन त्यावर चर्चा करणार आहोत, असे गांगुली यांनी सांगितले.

तज्ज्ञ कंपनीला का टाळले
अमिरातीत झालेल्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने जैवसुरक्षा वातावरणाची रचना करण्यासाठी ब्रिटनमधील रेस्ट्राटा या कंपनीशी करार केला होता. या वेळी मात्र बीसीसीआयने स्वतःहून रचना केली. या तज्ज्ञ कंपनीची या वेळी का मदत घेतली नाही. यावर गांगुली म्हणाले, या कंपनीचे भारतात फार मोठे अस्तित्व नाही, त्यामुळे आम्ही त्यांची सेवा घेतली नाही.


​ ​

संबंधित बातम्या