सॅमसन पुढच्या वेळी मोहीम फत्ते करेल - संगकारा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 April 2021

जिगर, विश्वास आणि कणखर वृत्ती महत्त्वाची

मुंबई :  संपूर्ण डावात सात देखणे षटकार मारून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेणारा संजू सॅमसन अखेरचा चेंडू मात्र सीमारेषेबाहेर मारू शकला नाही. त्यामुळे राजस्थानचा थोडक्यात पराभव झाला; परंतु संघाचे संचालक कुमार संगकारा यांनी सॅमसनच्या झुंजार प्रयत्नाचे कौतुक केले. पाचव्या चेंडूवर एकेरी धाव नाकारून सॅमसनने स्वतःकडे स्ट्राईक ठेवला होता, त्याच्या या निर्णयाचेही संगकारा यांनी समर्थन केले. आयपीएलमध्ये प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी मिळालेल्या सॅमसनने पंजाबविरुद्ध काल वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कमालीची शतकी खेळी केली. ६३ चेंडूत १२ चौकार आणि सात षटकारांसह त्याने ११९ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना अक्षरदीप सिंगच्या चेंडूवर सॅमसन सीमारेषेवर झेलचीत झाला आणि पंजाबने हा सामना चार धावांनी जिंकला.

पाचव्या चेंडूवर संजू सॅमसनला एकेरी धाव मिळत होती. समोर स्ट्राईकवर सर्वाधिक महागडा ख्रिस मॉरिस होता; परंतु सॅमसनने ती धाव नाकारली आणि अखेरच्या चेंडूवर षटकार मारण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्याच्या या धैर्यशील निर्णयाचे कुमार संगकारा यांनी समर्थन केले. संजूने स्वतःकडे जबाबदारी घेतली आणि त्याने ती जवळपास पूर्णही केली होती. त्याने मारलेला फटका पाच ते सहा यार्ड कमी पडला. सपूर्ण डावात टोलेबाजी करून तुम्ही फॉर्मात असता तेव्हा अशी जबाबदारी स्वतःकडेच घ्यायची असते, असे संगकारा यांनी सांगितले.

संजूने एकेरी धाव घेतली असती तर...? अशा शक्यतांबाबत निकालानंतर बोलले जाते; परंतु माझ्या मते खेळाडूने दाखवलेली जिगर, स्वतःवरचा विश्वास, कणखर वृत्ती आणि जबाबदारी सर्वात महत्त्वाची असते. या वेळी यश आले नसले, तरी तो निश्चितच पुढच्या वेळी मोहीम फत्ते करेल, यात शंका नाही, असे गौरोवोद्गार संगकारा यांनी काढले. 
संजू सॅमसनने दाखवलेल्या सातत्याबाबत बोलताना कुमार संगकारा म्हणाले, जेव्हा डावाची सुरुवातच तुम्ही जोरदार करता तेव्हा त्यात सातत्य राहाणे महत्त्वाचे असते; परंतु प्रत्येक सामन्यागणिक हे बदलत असते. प्रत्येक सामन्यात तुम्हाला नव्याने खेळी सुरू करायची असते. सॅमसन हा फॉर्म पुढच्या सामन्यांतही कायम ठेवेल, असा विश्वास आहे.


​ ​

संबंधित बातम्या