धोनीसोबत लढवय्या सॅम कुरेनचा फोटो का होतोय व्हायरल?

सकाळ स्पोर्ट्स टीम
Monday, 29 March 2021

सोशल मीडियावर सॅम कुरेन ट्रेडिंगमध्ये असून धोनीसोबतचा त्याचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेत सॅम कुरेन याने विक्रमी खेळी केली. भारतीय संघाने सामन्यासह मालिका जिंकली असली तरी सॅम कुरेन याने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर सॅम कुरेन ट्रेडिंगमध्ये असून धोनीसोबतचा त्याचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. जो फोटो व्हायरल होत आहे त्या फोटोमध्ये पिवळ्या रंगाच्या जर्सीत धोनी आणि पुण्याच्या मैदानात संघर्षानंतर हताश मुद्रेत असणारा सॅम कुरेन पाहायला मिळतोय. हा फोटो व्हायरल होण्यामागे खास कारण आहे. 

आयपीएलमध्ये सॅम कुरेन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेनंतर आता भारतात आयपीएलचा महासंग्राम रंगणार आहे. इंग्लंडचा सॅम कुरेन हा चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात आहे. साखळी फेरीत गारद झालेल्या चेन्नईकडून तो अशीच कामगिरी करुन चेन्नईसाठी उपयुक्त ठरेल, अशी भावना सॅम कुरेनच्या इनिंगमुळे चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सॅमची खेळी पाहून बटलरला आली धोनीची आठवण  

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने सॅम कुरेनचे कौतुक करताना मैदानात धोनी खेळतोय असा भास झाल्याचा उल्लेख सामन्यानंतर केला होता. हा उल्लेख करण्यामागेही सामन्यातील प्रसंग कारणीभूत आहे. ज्यावेळी इंग्लंडच्या संघ विजयाच्या समीप पोहचला होता. त्यावेळी सॅम कुरेन याने नॉन स्ट्राइकवर असलेल्या मार्क वुडला स्ट्राईक न देता आपण प्रत्येक चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार बऱ्याच सामन्यात असा धाडसी निर्णय घेताना पाहायला मिळाले होते. धोनीने या अंदाजात टीम इंडियाला आणि चेन्नई सुपर किंग्जला अनेक अशक्यप्राय वाटणारे सामने जिंकूनही दिले आहेत. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सॅम कुरेनने धोनीच्या या आठवणीला उजाळा दिल्याचे पाहायला मिळाले. कदाचित यामुळेच बटलरला सॅम कुरेनच्या खेळीनंतर धोनीची आठवण झाली असेल. 

धोनीला शेवटपर्यंत साथ देण्याचे सॅमने दिले होते संकेत

इंग्लंडचा संघ जून महिन्याच्या सुरुवातीपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. दुसरीकडे एप्रिल ते मे यादरम्यान आयपीएलचा 14 व्या हंगामातील सामने रंगणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सॅम कुरेन याने ब्रिटिश प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रीय संघाकडून कसोटी खेळण्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले होते. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ फायनलपर्यंत पोहचला तर न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध होणे मुश्किल होईल, असे संकेत देत धोनीला शेवटपर्यंत साथ देणार असल्याचे संकेत दिले होते. 


​ ​

संबंधित बातम्या