IPL 2021 : आयपीएल लढती मुंबईतही?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 March 2021

भारतीय मंडळाने आयपीएलच्या लढती मुंबईसह, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद येथे घेण्याचे ठरवले आहे.

 मुंबई : भारत - इंग्लंड मालिकेतील पुण्यातील एकदिवसीय लढती प्रेक्षकांविना घेण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवतानाच आयपीएलच्या लढती मुंबईत घेण्यासही मंजुरी दिल्याचे संकेत भारतीय क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी देत आहेत; मात्र त्यानंतरही मुंबईतच सर्व आयपीएल लढती घेण्याचा प्रारंभीचा प्रस्ताव बारगळल्याचे संकेतही मिळत आहेत. 

भारतीय मंडळाने आयपीएलच्या लढती मुंबईसह, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद येथे घेण्याचे ठरवले आहे. अर्थात दिल्लीतील लढतींबाबत स्थानिक क्रिकेट संघटना पूर्ण तयार नाही, त्याच वेळी कोलकात्यामधील लढतींचा पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमुळे फेरविचार होत आहे. अहमदाबादला अंतिम टप्प्याच्याच लढती घेण्याचे ठरले आहे.

ICC Test Rankings : रोहितची सर्वोत्तम रँकिंगला गवसणी; अश्विनलाही झाला फायदा

आयपीएलच्या प्राथमिक लढती मुंबईतील तीन (वानखेडे, ब्रेबॉर्न तसेच डी. वाय. पाटील स्टेडियम) यासह पुण्यात घेण्याचा विचार होता. ज्याद्वारे जैवसुरक्षा वातावरणात स्पर्धा घेणे सुकर झाले असते; मात्र मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने याबाबत फेरविचार झाला. त्यानंतर काही स्टेडियमपुरत्याच लढती मर्यादित ठेवण्याचे ठरले. महाराष्ट्र सरकारने प्रेक्षकांविना आयपीएल लढती घेण्यास हिरवा कंदील दाखवल्याने मुंबईचाही लढतीच्या आयोजनात समावेश करण्यात आला. 

Vijay Hazare Trophy 2021 :बिचारा अय्यर 198 धावांवर रन आउट; भावाचं द्विशतक हुकलं!

भारतीय क्रिकेट मंडळ आयपीएल ‘कारवाँ’ पद्धतीने घेण्याचा विचार करीत आहे. यात संघाची दोन गटात विभागणी करण्यात येईल. त्यात पहिल्या टप्प्यात एका गटातील लढती एकाच ठिकाणी होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गटातील संघ बदलून पुन्हा एकाच ठिकाणी लढती होतील.
 

येत्या पहिल्या आठवड्यात निर्णय?

भारतीय क्रिकेट मंडळ मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल, भारतीय मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांची यात महत्त्वाची भूमिका असेल. गेल्या काही दिवसांत देशाच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे ही स्पर्धा पुन्हा अमिरातीस घेण्याची चर्चा सुरु झाली; मात्र भारतीय मंडळ स्पर्धा भारतात घेण्यास उत्सुक आहे. 


​ ​

संबंधित बातम्या