IPL वर शाहिद अफ्रिदीचं वादग्रस्त वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 8 April 2021

IPL 2021 : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आयपीएलवरून पुन्हा एकदा बरळला आहे.

IPL 2021 : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आयपीएलवरून पुन्हा एकदा बरळला आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सतत चर्चेत असणाऱ्या आफ्रिदीनं यावेळेस आयपीएलवरुन बरळ ओकली आहे. आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रभावीत होत असल्याचा आरोप आफ्रिदीनं केला आहे.  पाकिस्तानबरोबर सुरु असलेली स्पर्धा सोडून दक्षिण आफ्रिका संघातील प्रमुख खेळाडू आयपीएलसाठी गेल्याचं पाहून आफ्रिदी हैराण झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळानं असी परवानगी कशी दिली? असा प्रश्नही आफ्रिदीनं उपस्थिती केला आहे. 
 
 बुधवारी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघानं आफ्रिकेचा २८ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे डी कॉक, मिलर, रबाडासह अनेक प्रमुख खेळाडू अनुपस्थित होते. कारण, आयपीएलसाठी ते भारतामध्ये आलेले आहेत. ९ एप्रिल २०२१ पासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. 

 संघातील प्रमुख खेळाडू नसल्यामुळे पाकिस्तान संघानं दक्षिण आफ्रिका संघाचा सहज पराभव केला. अखेरच्या सामन्यात पराभव करत पाकिस्तान संघानं मालिका २-१ नं जिंकली आहे. पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीनं ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. आफ्रिदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणाला की,  '' विजयासाठी पाकिस्तान संघाचं अभिनंदन. बाबरनं पुन्हा एकदा आपल्या लौकिकास साजेशी खेळी केली. फखरनेही आपला क्लास दाखवला.'' दुसऱ्या ट्विटमध्ये आफ्रिदीनं आयपीएलप्रति असणारा आपला राग व्यक्त केला आहे. आफ्रिदी म्हणाला की, ''क्रिकेट दक्षिण अफ्रीकाने मालिकेदरम्यानच खेलाडूंना आयपीएलसाठी जाण्याची परवानगी दिली, या निर्णायामुले मी चकीत झालो आहे. ज्यावेळी एखादी टी-२० लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारी पडत असेल तर वाईट वाटतं. याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.''

आयपीएल जगातील सर्वात महागडी आणि प्रसिद्ध क्रिकेट लीग स्पर्धा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकदा शाहिद आफ्रिदीनं नाराजी व्यक्त केली आहे. 
 

 


​ ​

संबंधित बातम्या