पराभवनंतर रोहितची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाला...

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 April 2021

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, आमच्याकडून नक्कीच काही चुका झाल्या...

IPL 2021 : मुंबई आणि बंगळुरु यांच्यातील पहिल्या लढतीनं आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरुवात झाली. शुक्रवारी चेपॉकच्या मैदानावर झालेल्या सलामीच्या लढतीत विराट कोहलीच्या आरसीबी संघानं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाचा अवघ्या दोन विकेटनं पराभव केला. या विजयासाह विराट कोहलीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयानं केली. पण दुसरीकडे रोहित शर्माच्या मुंबईनं दरवर्षीप्रमाणे हंगामाची सुरुवात पराभवानं केली. पण या पराभवानंतरही रोहित शर्मा निराश नाही. सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, आमच्याकडून नक्कीच काही चुका झाल्यात. पुढील सामन्यात त्या सुधारण्याच्या प्रयत्न नक्कीच करु.  पहिल्या सामन्यातील विजयापेक्षाही आयपीएल जेतेपद जिंकणं महत्वाचं आहे. 

सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, " पहिला सामना जिंकण्यापेक्षा जेतेपद जिंकणं अधिक महत्त्वाचं आहे. पहिल्या सामन्यात आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. पण आम्ही शेवटपर्यंत लढा दिला. हा एक चांगला प्रयत्न होता. आम्हाला २० धावा कमी पडल्या. परंतु पहिल्या सामन्यात काही चुका होत असतात. यापुढे लक्ष देऊ. युवा जेन्सन हा प्रतिभावान गोलंदाज असून त्याचा कोणत्याही परिस्थितीत उपयोग करू शकतो."

धोनीच आयपीएलचा 'बाहुबली'; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

अखेरच्या चार षटकांत खेळपट्टीनं बदलेला रंग तुम्ही पाहिला असेल. चेंडू थांबून बॅटवर जात होता. डिव्हिलियर्स आणि डॅन ख्रिश्चियन सारखे फलंदाज मैदानावर होते. आमच्याकडे बुमराह आणि बोल्ट होते. आम्ही त्यांना बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बाद करणे सोप नव्हतं. या सामन्यात झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करु, असेही रोहित म्हणाला.  

हेही वाचा ; MIvsRCB : रोहित रन आउट; चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच ठरवा

आरसीबीला पहिल्या सामन्यात विजय मिळवून देण्यात हर्षल पटेल, डिव्हिलिअर्स, मॅक्सवेल आणि  विराट कोहली यांचा मोलाचा वाटा आहे. मुंबईला १५९ धावांपर्यंत रोखण्यात हर्षल पटेल यानं सिंहाचा वाटा उचलला. तर १६० धावांचा पाठलाग करताना मॅक्सवेल, विराट आणि डिव्हिलिअर्स यांच्या छोटेखानी खेळी महत्वाच्या ठरल्या.
 


​ ​

संबंधित बातम्या