बटलरचा हैदराबादला शतकी तडाखा

पीटीआय
Monday, 3 May 2021

जोस बटलरचा आक्रमक शतकी तडाखा आणि कर्णधारबदल यातून सावरणे सनरायजर्स हैदराबादला जमले नाही. राजस्थान रॉयल्सने आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेट मोहिमेतील आपल्या मोहिमेला उभारी देताना हैदराबादला ५५ धावांनी सहज पराजित केले.

वॉर्नरला संघाबाहेर ठेवल्यानंतरही सनरायजर्सची पीछेहाटच
नवी दिल्ली - जोस बटलरचा आक्रमक शतकी तडाखा आणि कर्णधारबदल यातून सावरणे सनरायजर्स हैदराबादला जमले नाही. राजस्थान रॉयल्सने आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेट मोहिमेतील आपल्या मोहिमेला उभारी देताना हैदराबादला ५५ धावांनी सहज पराजित केले. 

अखेरच्या सात षटकात १०९ धावा फटकावत राजस्थानने द्विशतकी शिखर सर करीत विजयाचा भक्कम पाया रचला. हैदराबादने आपला माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला संघातूनही वगळले; पण संघाची कामगिरी ऊंचावली नाही. नवा कर्णधार केन विलियमसनला ना क्षेत्ररक्षकांची साथ लाभली ना गोलंदाजांची. राजस्थानला सफाईदार विजयापेक्षा धावगती उंचावल्याचेही समाधान लाभले. 

बटलर आणि सॅमसनने ८२ चेंडूत १५० धावांची भागीदारी करताना सातत्याने धावगती उंचावत नेली. हैदराबादच्या गोलंदाजीत फारसा दम नव्हता, हेही त्यांच्या पथ्यावर पडले. रशीदचा असलेला धोका दूर झाल्यावर राजस्थान जास्तच आक्रमक झाले आणि खराब क्षेत्ररक्षणाची साथ लाभली. मुंबईने द्विशतकी पाठलाग यशस्वी केला असला, तरी हैदराबादची क्षमता नव्हती. सहा षटकातील ५७ धावांची सलामी सोडल्यास ते काही करू शकले नाहीत. केन विलियमसन परतला, तेव्हा जेमतेम शतक फलकावर लागले होते. त्यामुळे दोन संघातील फरक कमी होण्याची शक्यताही दुरावली. 

संक्षिप्त धावफलक - राजस्थान ः ३ बाद २२० (जोस बटलर १२४ - ६४ चेंडूत ११ चौकार व ८ षटकार, संजू सॅमसन ४८ - ३३ चेंडूत ४ चौकार व २ षटकार) वि. वि. हैदराबाद ः ८ बाद १६५ (मनीष पांडे ३१ - २० चेंडूत ३ चौकार व २ षटकार, जॉनी बेअरस्टॉ ३० - २१ चेंडूत ४ चौकार व १ षटकार, केन विलियमसन २०, केदार जाधव १९, मुस्तफिझुर रहमान ४-०-२०-३, ख्रिस मॉरिस ४-०-२९-३).


​ ​

संबंधित बातम्या