सुपर ओव्हर टाकण्याची इच्छा माझीच : अक्षर

सुनंदन लेले
Tuesday, 27 April 2021

कोविडच्या तावडीतून सुटून मी बरा झालो होतो. चेपॉकच्या विकेटवर फिरकी गोलंदाज जास्त प्रभावी मारा करत आहेत हे मी बघत होतो. सामना सुरू झाल्यावर आणि गोलंदाजी केल्यावर मला विश्वास जाणवू लागला.

कोविडच्या तावडीतून सुटून मी बरा झालो होतो. चेपॉकच्या विकेटवर फिरकी गोलंदाज जास्त प्रभावी मारा करत आहेत हे मी बघत होतो. सामना सुरू झाल्यावर आणि गोलंदाजी केल्यावर मला विश्वास जाणवू लागला. जेव्हा सामना बरोबरीत झाला तेव्हा पाणी प्यायला सगळे आत आलो. चर्चा चालू होती की सुपर ओव्हर वेगवान गोलंदाजाने टाकावी. नंतर मैदानात जाण्याअगोदर मला वाटले, की या विकेटवर फिरकी गोलंदाज जास्त परिणामकारक ठरू शकतो. म्हणून मी आपणहून सुपर ओव्हर टाकायची इच्छा रिषभकडे बोलून दाखवली. तो रिकी पाँटिंगबरोबर बोलला आणि मला संधी देण्याचे पक्के झाले. मैदानात उतरून संघाला विजय मिळवून देण्याची मनोमन इच्छा पूर्ण झाली, अशी माहिती दिल्लीसाठी सुपर ओव्हर जिंकून देणाऱ्या अक्षर पटेलनेच जाहीर केली.

जडेजाने आम्हाला धक्के दिले : विराट
जडेजाच्या खेळाचा परिणाम झाला हे कबूल करावे लागेल. तरीही आम्ही चांगली सुरुवात केली होती. नंतर विकेट गमावल्याने गडबड झाली. जडेजा २०१६ पासून विश्वासाने खेळू लागला आहे. त्याने फलंदाजीत सुधारणा केली आहे. कसोटी सामन्यापासून ते एकदिवसीय सामने आणि आता संधी मिळाल्यावर टी २० सामन्यात तो छाप पाडतो आहे. हर्षलने चांगली गोलंदाजी केली होती. तो मेहनती खेळाडू आहे. एका षटकातील मारामारीने तो खराब गोलंदाज होत नाही. मला वाटते की असा पराभव स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातच होऊन गेलेला बरा. आता आमचे सामने अहमदाबादला होणार असल्याने तिथे विकेट कशी आहे ती काळ्या मातीची आहे का लाल मातीची याचा अभ्यास करून योजना आखावी लागेल असे विराट कोहली म्हणाला.

जडेजाला जास्त संधी देणे महत्त्वाचे : धोनी
गेल्या काही वर्षांत जडेजाच्या बॅटिंगमधली सुधारणा लक्षणीय आहे. तो सध्या आत्मविश्वास आणि उत्साहाने भारलेला आहे. ३० यार्ड अंतरात तो ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतो आहे आणि जितक्या सातत्याने चेंडू अडवून सरळ यष्टींवर फेकत आहे. त्याने शेवटच्या षटकात जो धुमाकूळ घातला त्याचा परिणाम नंतरच्या खेळावर नक्कीच झाला, असे चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला. पहिली फलंदाजी करून १६५ धावा केल्या तर ही धावसंख्या पुरेशी होती. जडेजाने त्यात मोठी भर टाकली. ज्याने समोरच्या संघाला सुरुवातीपासून धोका पत्करून मोठे फटके मारणे भाग पडले आणि त्यातच आम्हाला त्यांना बाद करायची संधी निर्माण झाली. असे धोनीने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या