कोलकता घसरण रोखणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 April 2021

आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेट लीगच्या सुरुवातीस घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी कोलकता नाईट रायडर्सचा उद्या प्रयत्न असेल. सूर हरपलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांचा कस पणास लागणार आहे. 

सूर हरपलेल्या राजस्थान विरुद्ध कामगिरी उंचावण्याची आशा
मुंबई - आयपीएल ट्वेंटी २० क्रिकेट लीगच्या सुरुवातीस घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी कोलकता नाईट रायडर्सचा उद्या प्रयत्न असेल. सूर हरपलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांचा कस पणास लागणार आहे. 

कोलकताचा संघ कागदावर भक्कम आहे. जगज्जेत्या  इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन नेतृत्व करीत असलेल्या संघास अजून लय गवसलेली नाही. परिणामी ते गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राजस्थान संघाच्या कामगिरीत सातत्याचा पूर्ण अभाव आहे. नेमका याचाच फायदा घेण्याचे कोलकताचे लक्ष आहे.  

चेन्नईविरुद्ध पॅट कमिन्सने चमकदार खेळी केली होती; पण त्यांचे नावाजलेले फलंदाज माफक अपयशी ठरले होते. मध्यममगती गोलंदाजांनी अखेरच्या षटकात धावांची खैरात केली. चेन्नईतील हळूवार खेळपट्टीवर कोलकता अपयशी ठरले, हेच मुंबईत घडले.  फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाडने गोलंदाजीवर हल्ला केला; तर मॉर्गन, शुभमन गिलचा धावांचा दुष्काळ कायम राहिला.

संघातील सर्वच खेळाडू चांगल्या कामगिरीसाठी आसुसलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीतून जिंकू शकतो, हा संघातील प्रत्येकाचा विश्वास अजून कायम आहे, असे कमिन्सने सांगितले होते. आंद्रे रसेलला सूर गवसल्याने मॉर्गन समाधानी आहे.
बंगळूरविरुद्धच्या एकतर्फी पराभवातून सावरण्यापूर्वी राजस्थानला मैदानात उतरणे भाग पडणार आहे. कर्णधार संजू सॅमसनने पंजाबविरुद्ध शतक केले होते. त्याच वेळी राजस्थान जिंकले. जो बटलर, मानन व्होरा, डेव्हिड मिलर या मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश त्यांची डोकेदुखी वाढवत आहे. गोलंदाजीतील प्रश्न वाढतच आहेत. जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. लियाम लिव्हिंगस्टोनने स्पर्धेचा निरोप घेतला आहे. त्यातच ख्रिस मॉरीस आणि मुस्तफिझूर रेहमान धावा रोखण्यात अपयशी ठरत आहेत.

आजचा सामना
कोलकता वि. राजस्थान प्रतिस्पर्ध्यांत २२ लढती
१२ विजय १०
१९१ सर्वोत्तम १९९
१२५ नीचांक ८१

  • खेळपट्टीचा अंदाज - पूर्णपणे फलंदाजांशी मैत्री राखणारी खेळपट्टी, धावांचा पाठलाग उपयुक्त; पण येथील आठपैकी पाच सामन्यांत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाची सरशी, यंदाच्या स्पर्धेतील येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १८०. 
  • गुणतक्क्यात - कोलकाता सहाव्या क्रमांकावर, तर राजस्थान तळाच्या आठव्या स्थानी
  • स्पर्धेतील कामगिरी - कोलकाता तसेच राजस्थानचा प्रत्येकी चारपैकी एका सामन्यात विजय
  • हवामानाचा अंदाज - लढतीच्या वेळी ३० अंश तपमान अपेक्षित; पण आर्द्रता ६० टक्के असणार. आकाश ढगाळलेले, पण पावसाची शक्यता नाही
  • गेल्या पाचपैकी चार सामन्यात कोलकाताचा विजय
  • गतस्पर्धेतील दोन्ही लढतीत कोलकताची सहज सरशी
  • कोलकाताचे १२ पैकी नऊ विजय धावांचा पाठलाग करताना
  • राजस्थानचे दहापैकी आठ विजय प्रथम फलंदाजी असताना

​ ​

संबंधित बातम्या