फलंदाजी सुधारण्याचे मुंबईपुढे आव्हान

पीटीआय
Thursday, 29 April 2021

सलग दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघावर यंदा सलग दोन पराभवांनंतर अस्तित्व दाखवून देण्याची वेळ आली आहे. सुमार फलंदजीने त्यांचा यंदा पराभूत झालेल्या प्रत्येक सामन्यात घात केला आहे.

दुबळ्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध रथी-महारथींना संधी साधण्याची अपेक्षा
नवी दिल्ली - सलग दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघावर यंदा सलग दोन पराभवांनंतर अस्तित्व दाखवून देण्याची वेळ आली आहे. सुमार फलंदजीने त्यांचा यंदा पराभूत झालेल्या प्रत्येक सामन्यात घात केला आहे. गोलंदाजीत फार ताकद नसलेल्या राजस्थानविरुद्ध तरी त्यांची फलंदाजी सुधारणार का? हा प्रश्न कायम आहे.

एकापेक्षा एक सरस फलंदाज असा मुंबई इंडियन्सचा लौकिक आहे, परंतु भरवशाच्या म्हशीला... अशी त्यांची अवस्था झालेली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हेच दोघे धावा करत आहेत; तर इतर जण केवळ हजेरी लावत आहेत. त्यामुळे पाच सामने झाले तरी त्यांची फलंदाजी सावरलेली नाही. दुसरीकडे एकेक वेगवान गोलंदाज संघातून जात असल्यामुळे राजस्थान संघात ख्रिस मॉरिस आणि मुस्तफिजूर रहीम हे दोनच परदेशी वेगवान गोलंदाज राहिले आहेत. या संधीचा तरी मुंबईचे फलंदाज फायदा घेणार की मागील पानावरून पुढे... असाच खेळ करणार याची उत्सुकता आहे.

क्विन्टॉन डिकॉक, हार्दिक आणि कृणाल पंड्या एरवी षटकारांची माळ लावण्याची क्षमता असलेले हे फलंदाज, परंतु यंदा जास्त चेंडू खेळूनही षटकार न मारू शकणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये या तिघांचा समावेश आहे. यावरून मंबईच्या फलंदाजीची दशा स्पष्ट होते. उद्याच्या सामन्यात डिकॉकला विश्रांती देऊन पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केलेल्या ख्रिस लीनचा विचार केला जाऊ शकतो.

मुंबईचे सर्व सामने चेन्नईत झाले होते. तेथील संथ खेळपट्टीवर त्यांना लय मिळाली नव्हती. उद्याचा सामना फिरोजशहा कोटला मैदानावर आहे, त्यामुळे नवे स्टेडियम आणि मैदान नवी दिशा दाखवेल, अशी आशा मुंबई संघाला आहे.
राजस्थानचा संघ सातव्या क्रमांकावर आहे; मात्र त्यांनी अगोदरच्या सामन्यात कोलकाताला पराभवाचा धक्का दिला होता. त्यांची फलंदाजी बहरली तर मुंबई संघासाठीही ते धोकादायक ठरू शकतात. जॉस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन मुंबईविरुद्ध हमखास यशस्वी ठरतात. उद्या खेळपट्टी पाहूनच मुंबईचा संघ गोलंदाजीची रणनीती तयार करेल.

आजचा सामना
मुंबई वि. राजस्थान प्रतिस्पर्ध्यांत २४ लढती
१२ विजय १२
२१२ सर्वोत्तम २०८
९२ नीचांक १०३

  • खेळपट्टीचा अंदाज - फलंदाजांपेक्षा गोलंदाजांना काहीशी जास्त साथ देणारी खेळपट्टी. सुरवातीस चेंडू जास्त स्विंग, पण त्यानंतर चेंडू कमी वेगाने येणार असल्याने फिरकी प्रभावी ठरेल. 
  • हवामानाचा अंदाज - चाळीस अंशाच्या आसपास असलेल्या तापमानात लढत सुरु होईल, त्याचबरोबर उत्तरार्धात दव निर्णायक ठरणार
  • स्पर्धेतील स्थान - मुंबई चौथ्या क्रमांकावर, तर राजस्थान सातवे.
  • यंदाच्या स्पर्धेत - मुंबई तसेच राजस्थानचे पाचपैकी दोन सामन्यात विजय
  • दिल्लीतील २०१९ च्या सातपैकी पाच सामन्यात धावांचा पाठलाग केलेला संघ विजयी. यंदाच्या स्पर्धेत मुंबईकडून धावांचा पाठलागच नाही
  • गेल्या पाच सामन्यात राजस्थानचे चार विजय

​ ​

संबंधित बातम्या