CSK ची बलस्थाने आणि कमजोरी; पाहा संघाचं विश्लेषण

सुनंदन लेले
Wednesday, 7 April 2021

IPL 2021 : बऱ्‍याच कालखंडानंतर चेन्नई सुपरकिंग्ज् संघात काही बदल झाले आहेत त्याचा घेतलेला हा आढावा.

IPL 2021 : आयपीएल सुरू झाल्यापासून सर्वांत जास्त सातत्यपूर्ण कामगिरी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज् संघांनी केली आहे. सुरुवातीपासून संघाची धुरा महेंद्रसिंग धोनीच्या हाती सोपवण्यात आली आहे. बऱ्‍याच कालखंडानंतर चेन्नई सुपरकिंग्ज् संघात काही बदल झाले आहेत त्याचा घेतलेला हा आढावा.

बलस्थाने : मेरे पास माँ है, हा दिवार सिनेमातील अजरामर डायलॉग आठवतो का... अगदी तोच डायलॉग चेन्नई सुपर किंग्ज् संघाबाबत लागू पडतो. जेव्हा संघ मालक श्रीनिवासन म्हणतील हमारे पास धोनी है. होय चेन्नई संघाचे सर्वांत मोलाचे बलस्थान कप्तान धोनी आहे. टी-२० क्रिकेटमधला सर्वांत वेगवान विचार करणारा खेळाडू धोनी आहे. फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनीसोबत गतवर्षी चांगली कामगिरी करणारा ऋुतुराज गायकवाड चेन्नई संघाची फलंदाजी मजबूत करतात. या क्रमवारीत अनुभवाची कमतरता अजिबात नाहीय तसेच मोठे फटके मारण्याची क्षमता त्यांचे बलस्थान बनते.

कमजोरी : जी खोली फलंदाजीत दिसते ती गोलंदाजीत दिसत नाही. त्याचबरोबर संघात वयाने जास्त असलेल्या गोलंदाजांवर भिस्त ठेवली गेली आहे  ज्यात इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्राव्होचा समावेश होतो. जोश हेझलवुडने बायो सिक्युरिटी बबलला कंटाळून स्पर्धेतून माघार घेतल्याने वेगवान गोलंदाजीतील कमजोरी अजून उफाळून वर आली आहे. शार्दुल ठाकूर संघात असल्याने तो ही कमजोरी नष्ट करेल का हे बघावे लागेल.

 हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव

संधी : चेन्नई संघ वयाने जास्त असलेल्या खेळाडूंनी भरलेला असल्याने त्यांना भाऊसाहेबांचा संघ म्हणून संबोधले जाते. धोनीला ही मोठी संधी असेल लोकांच्या टोमण्याला सडेतोड उत्तर द्यायची. ऋुतुराज गायकवाडला मोठी संधी आहे, कारण त्याने जर गतवर्षीचे सातत्य कायम ठेवले, तर निवड समिती त्याचा विचार भारतीय संघाकरता करू शकते.

धोका : कप्तान धोनी, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहीर गेल्या आयपीएलनंतर खरे स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाहीत. सराव कितीही केला तरी प्रत्यक्ष सामन्यात खेळताना मॅच प्रॅक्टीसचा असलेला अभाव काय परिणाम करतो हा सर्वांत मोठा धोका चेन्नई संघासमोर आ वासून उभा आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या