IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सची पंत गादी चालवणार

 सुनंदन लेले
Friday, 2 April 2021

मूळ कप्तान श्रेयस अय्यर दुखापतीने स्पर्धेबाहेर गेला असला, तरी दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी अजिबात कमजोर झालेली नाही.

आजपासून पुढचे आठ दिवस आठ आयपीएल संघांचा संक्षिप्त आढावा ‘स्वॉट’ विश्‍लेषणाद्वारे देणार आहोत. ‘स्वॉट’ म्हणजे ताकद, कमकुवतपणा, संधी आणि धोका. याचाच अर्थ असा, की प्रत्येक संघाची बलस्थाने काय आहेत, त्यांच्या संघातील कमजोरी काय आहे, संधी कुठे उपलब्ध आहे आणि धोका कुठे आहे. आज दिल्ली संघाचा आढावा

बलस्थाने : तगडी फलंदाजी

मूळ कप्तान श्रेयस अय्यर दुखापतीने स्पर्धेबाहेर गेला असला, तरी दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी अजिबात कमजोर झालेली नाही. सलामीला शिखर धवन आणि भन्नाट फॉर्ममध्ये असलेला पृथ्वी शॉ, मग अजिंक्‍य रहाणे, रिषभ पंत सोबतीने स्टिव्ह स्मिथ आणि हेटमायर दिल्ली संघाला मजबुती देतात.

कमकुवत बाजू : वेगवान गोलंदाजी

एकीकडे अश्विन आणि अक्षर पटेलच्या हजेरीने दिल्ली संघाची फिरकीची बाजू मजबूत दिसत असताना वेगवान गोलंदाजीत थोडी कमकुवत वाटत आहे. कागिसो रबाडा आणि त्याचा दक्षिण आफ्रिकन सहकारी नॉर्किया सोबत अनुभवी इशांत शर्मा आणि उमेश यादव संघात दिसत आहेत. 

संधी : रिषभ पंतचे नेतृत्व

दिल्ली संघाचे नेतृत्त्व रिषभ पंत करणार असल्याने त्याला मोठी संधी आहे. तसेच रिषभ मूळचा अत्यंत सकारात्मक आणि आक्रमक खेळाडू असल्याने तो संघाला वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. त्याला मार्गदर्शन करायला स्टिव्ह स्मिथ आणि अजिंक्‍य रहाणे असल्याने संघाला वेगळी कामगिरी करायची मोठी संधी आहे. 

2011 चा वर्ल्ड कप जिंकून उपकार केले नाहीत : गौतम गंभीर

धोका : एकच अष्टपैलू खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स संघात मार्कस्‌ स्टॉयनिस हा एकच दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. होय टॉम करनसुद्धा आहे दिल्ली संघात, पण टॉम करनला अजून फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर गोलंदाजी करताना काय युक्ती वापरायची याचा उलगडा झालेला दिसत नाही. स्टॉयनिस उत्तम कामगिरी करू लागला तर शंकाच रहाणार नाही, पण जर दुर्दैवाने त्याला लय सापडली नाही किंवा त्याला दुखापत झाली तर दिल्ली संघाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.


​ ​

संबंधित बातम्या