‘गुरू धोनी आणि शिष्य पंत' आज आमनेसामने; पाहा कोणाचं पारडं आहे जड

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 April 2021

IPL 2021 : धोनी आणि त्याचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेला रिषभ पंत उद्या आयपीएलच्या दुसऱ्याच दिवशीच आमनेसामने येत आहेत.

IPL 2021 : मुंबई - भारतीय क्रिकेटमधील इतिहास आणि वर्तमान अशा गुरू-शिष्यांमध्ये अर्थात महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेला रिषभ पंत उद्या आयपीएलच्या दुसऱ्याच दिवशीच आमनेसामने येत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातो सामना होत असला, तरी अनुभवी धोनीच्या विरुद्ध पंत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाला गत आयपीएल स्पर्धेत उपविजेतेपदापर्यंत मजल मारता आली होती; तर अनुभवी चेन्नईचा संघ अमिरातीत झालेल्या त्याच स्पर्धेत सातव्या स्थानापर्यंत घसरला होता; परंतु आता दोन्ही संघात काही बदल झाले आहेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे रिषभ पंतवर नेतृत्वाची जबाबदारी आहे; तर धोनीच्या संघात सुरेश रैना, द्वेन ब्रावो असे खेळाडू पुन्हा एकदा संघाला गतवैभव मिळवून देण्यास सज्ज झाले आहेत. 

नेतृत्वपदी माझा पहिलाच सामना महीभाईविरुद्ध आहे. मी त्याच्याकडून बरेच काही शिकलो आहे. त्यामुळे उद्याचा सामना माझ्यासाठी अनुभवात आणखी भर घालणारा असेल. धोनीकडून मिळालेली शिकवण आणि माझा अनुभव एकत्र करून मी उद्याच्या सामन्यासाठी तयार आहे, असे रिषभ पंतने सांगितले.  श्रेयस अय्यर नसला, तरी दिल्लीची फलंदाजी ताकदवर आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव स्मिथ आणि स्वतः पंत असे नावाजलेले फलंदाज आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याला सूरही सापडलेला होता.  रिषभ पंत अजूनपर्यंत कोणत्याही जबाबदारीविना खेळला होता; पण आता तो कर्णधारपदाच्या ओझ्याखाली कशी फलंदाजी करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : सीएसकेची बलस्थाने आणि कमजोरी, पाहा कसा आहे धोनीचा संघ

पृथ्वी शॉवर लक्ष
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर वेगळा पृथ्वी शॉ समोर आला आहे. विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत त्याने सर्वाधिक ८२७ धावा करताना मुंबईला विजेतेपद मिळवून दिले होते. निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो यंदाची आयपीएल गाजवण्याची शक्यता आहे. गत स्पर्धेत फॉर्म हरपल्यामुळे त्याला काही सामन्यांतून वगळण्यात आले होते. यंदा ती सर्व कसर तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करेल.

वेगवान गोलंदाजी कमकुवत?
दिल्लीची ताकद कागिसो रबाडा आणि नॉर्कया या वेगवान गोलंदाजांमध्येही आहे; परंतु उद्याच्या पहिल्या सामन्यासाठी ते उपलब्ध नसतील. त्यामुळे उमेश यादव, ईशांत शर्मा, ख्रिस वोक्स यांच्यावर मदार असेल. अश्विनच्या रूपाने त्यांच्याकडे अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला चेन्नईला फलंदाजीची घडी व्यवस्थित बसवावी लागणार आहे. 

हेही वाचा : धोनीचं आयपीएलचा बाहुबली; सामने जिंकण्यात चेन्नई मुंबईपेक्षा वरचढ

चेन्नई वि. दिल्ली
(एकमेकांविरुद्ध २३ लढती)
१५ विजय ८
२२२ सर्वोत्तम १९८
११० नीचांक ८३

  • गेल्या पाच सामन्यात चेन्नईचे तीन तर दिल्लीचे दोन विजय
  • अमिराती लीगमधील दोनही लढतीत दिल्लीची सरशी
  • प्रथम फलंदाजी करताना १२ पैकी ९ सामन्यात चेन्नईचा विजय
  • धावांचा पाठलाग करताना ११ पैकी ६ लढतीत चेन्नईची सरशी 
  • मुंबईतील खेळपट्टीवर धावांचा पाऊस अपेक्षित, पण धावांचे संरक्षण दवाची शक्यता असल्याने अवघड

​ ​

संबंधित बातम्या