जोफ्राच्या हातात दोन महिन्यापासून होती काच; ऑपरेशननंतर IPL खेळणार?

सकाळ स्पोर्ट्स टीम
Tuesday, 30 March 2021

जानेवारीमध्ये जोफ्रा आर्चर घरात साफ सफाई करत असताना फिशटँक खाली पडला. यावेळी त्याला काच लागली होती.

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) बोटाची नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली. घरात साफ सफाई करत असताना फिशटँ फुटल्याने त्याला  दुखापत झाली होती. या दुखापतीनंतरही भारताविरुद्धच्या कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी तो मैदानात उतरला होता. त्याच्या बोटावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ऑपरेशनवेळी त्याच्या हाताच्या बोटातून काचेचा छोटासा तुकडा बाहेर काढण्यात आलाय. इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाइल्स यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

जानेवारीमध्ये जोफ्रा आर्चर घरात साफ सफाई करत असताना फिशटँक खाली पडला. यावेळी त्याला काच लागली होती. दुखापत किरकोळ असेल म्हणून जोफ्राने याकडे दुर्लक्ष केले. पण कसोटी आणि टी-20 मालिकेनंतर भारता विरुद्धच्या वनडे मालिकेला त्याला मुकावे लागले. मंगळवारी 29 मार्च रोजी त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया झाली. यावेळी डॉक्टरांना त्याच्या बोटामध्ये छोटीशी काच आढळली. डाव्या हाताच्या मधल्या बाटात काच घूसली होती. भारताविरुद्धची वनडे मालिकेला मुकलेला जोफ्रा आर्चर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व करतो. राजस्थानच्या ताफ्यातील तो प्रमुख गोलंदाज आहे.  

हरमनप्रीतला कोरोना; लवकरच फिल्डवर परतण्याचा व्यक्त केला विश्वास

दुखापतीमुळे त्याला 14 व्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे. तो कधीपर्यंत फिट होईल याची कोणतीही माहिती सध्याला देण्यात आलेली नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यासंदर्भात अद्यापही संभ्रम कायम आहे.  25 वर्षीय जोफ्रा आर्चरने इंग्लंडकडून सर्व क्रिकेट प्रकारात एकूण 42 सामने खेळले आहेत. इंग्लंडच्या संघाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जोफ्रा आर्चरने 2018 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या हंगामात त्याने 10 सामन्यात 15 विकेट घेऊन लक्षवेधले होते. 2019 च्या हंगामात त्याने 11 सामन्यात 11 तर युएईमध्ये रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील 14 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. 


​ ​

संबंधित बातम्या