विराटचा बंगळूर दुसऱ्या विजयासाठी सज्ज 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 April 2021

IPL 2021 : कोहलीचा बंगळूर संघ आपली वाटचाल अधिक भक्कम करण्यासाठी आता हैदराबादविरुद्धही तेवढ्याच ताकदीचा खेळ करण्यास सज्ज

IPL 2021 : गतविजेत्या मुंबईला पराभूत करून आत्मविश्वास उंचावलेला विराट कोहलीचा बंगळूर संघ आपली वाटचाल अधिक भक्कम करण्यासाठी आता हैदराबादविरुद्धही तेवढ्याच ताकदीचा खेळ करण्यास सज्ज झाला आहे. हैदराबादला मात्र पहिल्या पराभवानंतर संघरचनेपासून आत्मविश्वासापर्यंत पुन्हा जुळवाजुळव करावी लागणार आहे. यंदाच्या आयपीएलची सुरुवात बंगळूरच्या विजयाने झाली. अखेरच्या चेंडूपर्यंत विजयाची वाट पाहावी लागली असली, तरी गुणतक्त्यात वाढलेले गुण त्यांचे हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी स्फुरण देणारे आहे. त्यातच हुकमी सलामीवीर देवदत्त पदिक्कल पुनरागमनाच्या वाटेवर आहे.

चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमलर सायंकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. विराट कोहलीच्या आरसीबीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात विजयानं केली तर हैदराबादला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. हैदराबादचा पराभव करत विजयाचा सिलसीला कायम ठेवण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल. तर लागोपाठ तिसऱ्या सामन्यात आरसीबीचा पराभव करण्यासाठी हैदराबाद प्रयत्नशील असेल. २०२० मध्ये हैदराबादने सलग दोन वेळा आरसीबीचा पराभव केला होता. 

आरसीबीच्या संघात तीन बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवा रजत पाटीदार याच्या जागी देवदत्त पडिक्कल संघात पुनरागमन करु शकतो. याशिवाय विकेटकीपर बल्लेबाज मोहम्मद अजहरुद्दीन आणि ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम जम्पा यांना अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते.  डेनियल क्रिश्चियन आणि शाहबाद अहमद यांना आराम दिला जाऊ शकतो. हैदराबाद संघातही साहाच्या जागी केदार जाधवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दोन्ही संघ आतापर्यंत १८ वेळा समोरासमोर आले आहेत. यामध्ये हैदराबादनं १० तर आरसीबीनं सात सामन्यात विजय संपादन केला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता.


​ ​

संबंधित बातम्या