दिल्ली परतफेड करणार का? रोहित-पंत आमनेसामने

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 20 April 2021

IPL 2021 : गत स्पर्धेत एकमेकांमध्ये चार सामने. चारही सामन्यांत मुंबईचा विजय

चेन्नई - गत स्पर्धेत जेव्हा जेव्हा दिल्लीचा संघ समोर आला, तेव्हा तेव्हा मुंबईने अंतिम सामन्यासह दिल्लीला पाणी पाजले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच उद्या या दोन संघांत सामना होत आहे. दोन्ही संघ फॉर्मात असल्यामुळे `काँटे की टक्कर` पाहायला मिळणार आहे.  दोन विजय व एक पराभव, असा दोन्ही संघांचा पहिल्या तीन सामन्यानंतर लेखाजोखा आहे. दिल्लीकडून शिखर धवन भलत्याच फॉर्मात आहे; तर मुंबई एकत्रितपणे उत्तम कामगिरी करत आहे. त्यामुळे मुंबईचे पारडे जड आहे. मूळ मुंबईकर असलेला पृथ्वी शॉ रोहित शर्माच्या मुंबईविरुद्ध कशी कामगिरी करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. सलामीच्या सामन्यात नेहमीप्रमाणे पराभव झाल्यानंतर मुंबईने आपली कामगिरी उंचावली आणि गतविजेतेपदाच्या लौकिकाप्रमाणे त्यांच्याकडून खेळ होत आहे. सलग दोन सामन्यात त्यांनी दीडशे धावसंख्या निर्णायक ठरवली आहे. एरवी फलंदाजी भक्कम असलेली मुंबईची गोलंदाजी आता सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. बुमरा-बोल्ट हे वेगवान गोलंदाज, तर त्यानंतर राहुल चहर फिरकीत कमाल करत आहे.

एकापेक्षा एक सरस फलंदाज असलेल्या मुंबईची फलंदाजी मात्र तीन सामने झाले, तरी अडखळत आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात किएरॉन पोलार्डने अखेरच्या षटकांत मारलेल्या दोन षटकारांमुळे मुंबईला दीड धावा करता आल्या होत्या त्या अगोदरच्या कोलकाताविरुद्ध सूर्यकुमार आणि रोहित शर्मामुळे ही मजल मारता आली होती. आता प्रगती करण्यासाठी मुंबईला इतर फलंदाजांनाकडून योगदान आवश्यक आहे. तसेच जम बसल्यावरही रोहित, सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दिल्लीची फलंदाजी शिखर धवन-पृथ्वी शॉ आणि कर्णधार रिषभ पंत यांच्यावर अवलंबून आहे हे तिघांनाच सूर सापडलेला आहे. मुंबईविरुद्ध विजयाची अपेक्षा बाळगायची असेल, तर इतरांनाही तेवढीच आश्वासक फलंदाजीची करावी लागणार आहे. स्टीव स्मिथला कालच्या पंजाबविरुद्ध संधी देण्यात आली होती; परंतु १२ चेंडू खेळल्यानंतर त्याला नऊच धावा करता आल्या होत्या; मात्र त्याला लगेचच वगळण्याच निर्णय घेण्यात येणार नाही. 

दिल्लीला गोलंदाजीची चिंता असेल. कागिसो रबाडा हा हुकमी वेगवान गोलंदाज असला, तरी त्याची गेल्या दोन सामन्यांत धुलाई झालेली आहे. ख्रिस वोक्सही अपेक्षेपेक्षा जास्त धावा देत आहे. उद्याच्या सामन्यात त्याच्याऐवजी नॉर्कियाला संधी मिळण्याची शक्यता आहे.  गत स्पर्धेत एकमेकांमध्ये चार सामने. चारही सामन्यांत मुंबईचा विजय

ठिकाण - चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
खेळपट्टी - फिरकीस साथ देण्याची शक्यता
वेळ - सायंकाळी ७.३० पासून


​ ​

संबंधित बातम्या