पोलार्डचा 105 मीटरचा गगनचुंबी षटकार, गोलंदाज राहिला पाहातच; पाहा Video

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 18 April 2021

IPL 2021 आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मॅक्सवेल यानं 100 मीटरचा षटकार लगावला आहे. तर सूर्यकुमार यादव यानं 99 मीटरचा षटकार मारलाय. 

 

 

IPL 2021 : शनिवारी झालेल्या सामन्यात अखेरच्या दोन चेंडूवर दोन खणखणीत षटकार लगावत पोलार्डनं मुंबईला सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली. दोन्ही संघामध्ये हाच फरक दिसून आला. पोलार्डनं आपल्या 35 धावांच्या छोटेखानी खेळीत तीन षटकार लगावले. यामधील मुजीबला मारलेला षटकार तब्बल 105 मीर लांब होता. आयपीएल 14 व्या हंगामातील हा सर्वात लांब षटकार ठरला आहे. सनराइजर्स हैदराबाद (SRH)  विरोधात17 व्या षटकात मुजीब उर रहमानच्या चेंडूवर पोलार्डनं गगनचुंबी षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले होते. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मॅक्सवेल यानं 100 मीटरचा षटकार लगावला आहे. तर सूर्यकुमार यादव यानं 99 मीटरचा षटकार मारलाय. 

आयपीएलच्या इतिहासात म्हणजेच 2008 पासून आतापर्यंत सर्वाधिक लांब षटकार चेन्नईच्या खेळाडूच्या नावावर आहे. एल्बी मोर्कल यानं 2008 मध्ये 125 मीटर लांब षटकार लगावला होता. त्यानंतर पंजाबकडून खेळणाऱ्या प्रविण कुमारचा क्रमांक लागतो. प्रविण कुमारनं 2011 मध्ये 124 मीटर लांब षटकार लगावला होता. 2012 मध्ये धोनीनं 112 मीटर, 2009 मध्ये युवराजनं 119 मीटर, 2010 मध्ये रॉबिन उथप्पा 120 मीटर आणि  2017 मध्ये गौतम गंभीरने 117 मीटर लंबा षटकार लगावला होता. 

पोलार्डची तुफानी फटकेबाजी -
संथ खेळपट्टीवर पोलार्डनं केलेल्या छोटेखानी तुफानी फलंदाजीमुळे मुंबई संघानं 150 धावा केल्या. पोलार्डनं 22 चेंडूत 35 धावा चोपल्या. या खेळीदरम्यान पोलार्डनं तीन षटकार आणि एक चौकार लगावला.  जिथं दिग्गज फलंदाज अडखळत होते, त्या परिस्थितीत पोलार्डनं फटकेबाजी केली.

मुंबईचा विजय - 
आयपीएलमधील नवव्या सामन्यात हैदराबाद संघानं पुन्हा एकदा नांगी टाकली. हैदराबाद संघाचा स्पर्धेतील हा लागोपाठ तिसरा पराभव होय. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. क्विंटन डिकॉक 40 आणि रोहित शर्माच्या 32 धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पोलार्डने अखेरच्या षटकात 22 चेंडूत 35 धावा करत मुंबईच्या धावफलकावर 150 धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ 137 धावांत आटोपला. 


​ ​

संबंधित बातम्या