IPL 2021 - मुंबईतील आयपीएल हायअलर्टवर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 April 2021

आयपीएल स्पर्धेची सुरुवात जशी जवळ येत आहे, तशी कोरोनाची चिंता वाढवली आहे. मुंबईत तर भीती अधिकच वाढली आहे. 

मुंबई - आयपीएल स्पर्धेची सुरुवात जशी जवळ येत आहे, तशी कोरोनाची चिंता वाढवली आहे. मुंबईत तर भीती अधिकच वाढली आहे. एकीकडे वाढती रुग्णसंख्या, त्यात लॉकडाऊनचा आलेला इशारा, यामुळे बीसीसीआय आणि संघमालक दक्ष झाले आहेत. त्यातच वानखेडे स्टेडियमवरील दहा ग्राउंड्‌समनना झालेला कोरोनाचा संसर्ग अधिकच चिंता वाढविणारा आहे. बीसीसीआयने हैदराबादला सज्ज राहण्यास सांगितले असल्यामुळे मुंबईतील सर्व सामने आता हैदराबादला हलवले जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाबाबतची मुंबईतील स्थिती बिकट होत चालली आहे. आयपीएल काही दिवसांवर आलेली असताना वानखेडे स्टेडियम पूर्ण तयार केले जात आहे. मैदान आणि खेळपट्ट्या जवळपास तयार होत असून शेवटचा हात फिरविणे सुरू आहे. त्यातच आठ  ग्राउंड्‌समन  कोरोनाबाधित झाल्याचे निदान झाल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. वानखेडेवर एकूण १० सामने होणार आहेत.

क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वानखेडेवर पहिला सामना १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल आणि माजी विजेत्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. कोरोनाच्या आक्रमणामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेली आयपीएल अमिरातीत खेळवण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी देशातच कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेल्यामुळे यंदाच्या स्पर्धेसाठी देशालाच प्राधान्य देण्यात आले.  मुंबईसह सहा ठिकाणी सामने होणार आहेत; पण मुंबईत कोरोना रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बीसीसीआयची झोप उडवली आहे.

आठ   ग्राउंड्‌समन  कोरोनाबाधित झाल्यामुळे वानखेडेच्या मैदानाची तयारी करणाऱ्या इतर सर्व संबंधितांचीही चाचणी करण्यात येणार आहे. बाधिक आठ जणांचे विलगीकरण करण्यात  आले आहे. वानखेडे स्टेडियमला गरज लागली, तर मुंबई क्रिकेट संघटनेची बीकेसी येथील शरद पवार अकादमी किंवा कांदिवली येथील सचिन तेंडुलकर अकादमीतील   ग्राउंड्‌समनना येथे आणून तयारी पूर्ण करण्याचा पर्याय मुंबई क्रिकेट संघटनेकडे आहे.

हे वाचा - अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

हैदराबादला सामने हलवणार?
आयपीएल होणाऱ्या सहा ठिकाणांत हैदराबादचा समावेश नव्हता; परंतु आता त्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. मुंबईतील अद्याप कोणत्याही फ्रँचाईसने ‘बीसीसीआय’कडे मागणी केलेली नाही; पण लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली, तर मात्र विचार बदलला जाऊ शकतो; मात्र सध्या तरी सामने इतरत्र हलवण्याचा आमचा विचार नाही, एवढ्या कमी वेळात इतर ठिकाणी जैव सुरक्षा वातावरण तयार करणे सोपे नाही, केवळ  खेळाडू किंवा संघ नाही तर इतर अनेक जणही त्यात सहभागी असतात, असे ‘बीसीसीआय’कडून स्पष्ट  करण्यात आले.


​ ​

संबंधित बातम्या