Mumbai IPL Matches : ग्राऊंड स्टाफही जैवसुरक्षा वातावरणात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 April 2021

चाचणीनंतर निगेटिव्ह कर्मचाऱ्यांचा मुक्काम स्टेडियम परिसरातच
 

मुंबई : आयपीएलमधील मुंबईतील लढती एका आठवड्यावर असताना त्या अन्यत्र आयोजित करणे जवळपास अशक्य आहे. यामुळे लीगच्या सुरळीत संयोजनासाठी ग्राऊंड स्टाफनाही लढती संपेपर्यंत जैवसुरक्षा वातावरणात ठेवण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईचा धडा घेऊन हीच पद्धत अन्य केंद्रांवरही अमलात आणण्याचा विचार होत आहे. मार्चच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लीगच्या मुंबईतील आयोजनाबाबत प्रश्न घेतला जात होता. त्यातच आता वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील आठ कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने चिंता वाढली होती; मात्र लीगच्या लढती आता अन्यत्र हलवण्याचा पर्याय अशक्य असल्याचेच संकेत मिळत आहेत.

वानखेडेवरील लढती अन्यत्र होणार नाहीत असे मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव संजय नाईक यांनी सांगितले. मुंबई क्रिकेट संघटनेचा ग्राऊंड स्टाफ वांद्रे-कुर्ला संकुल तसेच कांदिवली येथेही आहे. त्यामुळे मुंबई संघटनेकडे ग्राऊंड स्टाफची वानवा नाही. तीनही ठिकाणच्या ग्राऊंड स्टाफला सोमवारी वानखेडे स्टेडियमवर कोरोना चाचणीसाठी येण्यास सांगितले आहे. भारतीय क्रिकेट मंडळच ही चाचणी घेणार आहे. चाचणीत पॉझिटिव्ह येणाऱ्यांना घरी पाठवण्यात येईल, तसेच त्यांना उपचार घेण्याची सूचना करण्यात येईल. निगेटिव्ह येणारे कर्मचारी वानखेडे स्टेडियमवर थांबतील.

क्रिकेटच्या मैदानातील वर्ल्ड रेकॉर्ड; जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं

निगेटिव्ह येणाऱ्या ग्राऊंड स्टाफची निवासाची व्यवस्था गरवारे क्लब हाऊसमध्ये करण्यात येईल. मुंबईतील लढती संपेपर्यंत हे कर्मचारी तिथेच राहतील. त्यांचा मुक्काम पूर्णपणे जैवसुरक्षा वातावरणातच असेल. सामने यापूर्वीच प्रेक्षकांविना घेण्याचे ठरले आहे. ग्राऊंड स्टाफ जैवसुरक्षा वातावरणात राहिल्यामुळे सामने पूर्णपणे सुरक्षित वातावरणात होणार आहेत, असे मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीतील वरिष्ठ सदस्यांनी सांगितले.

सामन्यासाठी २० ग्राऊंड स्टाफ आवश्यक

1 एका सामन्याच्या आयोजनासाठी १५ ते २० ग्राऊंड स्टाफ कर्मचारी आवश्यक असतात. मुंबई क्रिकेट संघटनेतील तीनही सुविधा एकत्र केल्यास सुमारे ५० कर्मचारी आहेत. संघांचा सराव वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात होत आहे. तेथील कर्मचाऱ्यांची यापूर्वीच संकुलाच्या परिसरात व्यवस्था करण्यात आली आहे. मार्चपासून आयपीएलमधील संघ सराव करीत आहेत अथवा मैत्रीपूर्ण सामने खेळत आहेत.

2 ग्राऊंड स्टाफकडे गवताची छाटणी, मैदानात पाणी मारणे, खेळपट्टीची निगा, त्यावर रोलिंग करणे हे काम असते. त्या वेळी कर्मचाऱ्यांची चार जणांच्या गटात विभागणी केलेली असते. प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी ड्रिंक्स मैदानात घेऊन जाणे, त्या वेळी खेळपट्टीच्या क्रीजची पुन्हा आखणी करणे, स्कोअरबोर्ड सांभाळणे हे काम असते. सरावाच्या वेळी नेट उभारणे, ते काढणे, मैदानात खड्डे पडले असतील तर भरणे, असे काम आहे.

3 आता वानखेडेबाबत बोलायचे झाल्यास खेळपट्टी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रत्यक्ष सामन्यापूर्वीची खेळपट्टी आता दोघेतिघेही करू शकतात. आता अन्य ठिकाणचे कर्मचारी आल्यास त्यांना प्रत्यक्ष मैदानात किती पाणी मारायचे याची नेमकी कल्पना नसते; मात्र भारतीय मंडळाने नेमलेले क्युरेटर प्रशांत राव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी करू शकतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोर्ट स्टाफ यापूर्वीपासून काम करीत आहे. त्यामुळे सामन्याच्या वेळी कोणतेही प्रश्न येणार नाहीत, अशी ग्वाही मुंबई संघटनेच्या कार्यकारिणीतील सदस्य नदीम मेमन यांनी दिली. भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या