IPL 2021 : टाईमपास करणाऱ्या टीमचे पैस कट होणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 31 March 2021

एका तासात षटके 14 निश्‍चित करण्यात आली आहेत. यामध्ये अडीच-अडीच मिनिटांच्या दोन्ही टाईम आऊटचाही समावेश आहे. 

मुंबई : सामने कितीही वाजता सुरू झाले, तरी निवांतपणे सामने संपत असलेल्या आयपीएलला यंदा वेळेच्या निर्बंधाची वेसण घालण्यात येणार आहे. निर्धारित 90 मिनिटांत पहिला डाव आणि त्यानंतर याच वेळेत पुढचाही डाव संपायला हवा, अशी नियमावली आयपीएलने प्रत्येक संघांना पाठवली आहे.  निर्धारित वेळ कितीही असली, तरी आयपीएल आणि टाईमपास हे समीकरण गेल्या कित्येक स्पर्धांपासून तयार झालेले आहे; पण या वेळी मात्र आयपीएल प्रशासनाने वेळेत सामने संपण्यासाठी स्पर्धा सुरू होण्याअगोदरपासूनच सर्व संघांना जाणीव करून दिली आहे.

एका तासात षटके 14 निश्‍चित करण्यात आली आहेत. यामध्ये अडीच-अडीच मिनिटांच्या दोन्ही टाईम आऊटचाही समावेश आहे. निर्धारित वेळेस डाव पूर्ण करण्यासाठी मैदानावरील पंचांसह चौथ्या पंचांकडे अधिकार दिले आहेत. फलंदाजी करण्यासाठी संघाकडून जर वेळकाढूपणा केला जात असेल, तर पंच त्यांना त्याची जाणीव करून देतील; तरीही अधिक वेळ घेतला गेला, तर सामना मानधनातून रक्कम कापून घेण्यात येईल.

फलंदाजांना टार्गेट माहित नव्हतं ही अफवाच; जाणून घ्या गोंधळामागचे नेमकं कारण

‘सॉफ्ट सिग्नल’ निकाली

वादग्रस्त ठरत असलेल्या सॉफ्ट सिग्नलबाबत आयसीसीने कोणताही निर्णय घेतला नसला, तरी आयपीएलमध्ये मात्र या ‘सिग्नल’चा समावेश न करण्याचा निर्णय आयपीएलने घेतला आहे. पंचांना एखादा निर्णय घेण्यास अडचण येत असेल, तर ते टीव्ही पंचांची मदत घेऊन निर्णय देऊ शकतात.
 


​ ​

संबंधित बातम्या