IPL 2021 : मुंबईत आले अन् क्वारंटाईन झाले; रबाडा-नोर्तजे CSK विरुद्धच्या सामन्याला मुकणार

टीम सकाळ स्पोर्ट्स
Tuesday, 6 April 2021

दक्षिण अफ्रिकेच्या या दोन गोलंदाजांनी युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती.

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे मुंबईमध्ये पोहचले. दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झाल्यामुळे कोरोनाच्या नियमावलीनुसार त्यांना 7 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात दिल्लीच्या संघाला त्यांच्याशिवायच मैदानावर उतरावे लागेल. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज 10 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरुन आयपीएल स्पर्धेला सुरुवात करतील. 

दक्षिण अफ्रिकेच्या या दोन गोलंदाजांनी युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. या दोघांनी संघाला फायनलपर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. हे दोन्ही खेळाडू मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने एक निवेदन जारी केले आहे. कगिसो रबाडा आणि एनरिच नोर्तजे मंगळवारी मुंबईमध्ये पोहचले. हे दोन्ही खेळाडू आठवडाभर हॉटेलमध्ये क्वारंटाईनची प्रक्रिया पूर्ण करतील, अशी माहिती संघाकडून देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरच्या खांद्याच्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाला तो मुकणार आहे. त्याच्याऐवजी रिषभ पंतकडे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची धूरा सोपवण्यात आली आहे. 

IPL 2021 : पंतचा ट्रेलर पाहिला; रेकॉर्डचा पिक्चर अभी बाकी है दोस्त!

युएईच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेत रबाडाने 17 सामन्यात 548 धावा खर्च करुन 30 विकेट घेतल्या होत्या. यात त्याने दोन वेळा त्याने चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. पर्पल कॅपच्या दावेदारीसाठी तो शेवटपर्यंत शर्यतीतही राहिला होता. 2017 पासून तो आयपीएलच्या रिंगणात उतरला असून या हंगामात त्याने 6 विकेट घेतल्या होत्या. 2019 मध्येही त्याने 25 विकेटसह लक्षवेधी कामगिरी केली होती. दिल्लीच्या गोलंदाजीत रबाडा हा प्रमुख गोलंदाज असून नोर्तजे त्याला उत्तम साथ दिताना दिसले. त्याने 16 सामन्यात 22 विकेट घेतल्या असून यंदाच्या हंगामातही त्यांच्याकडून अशाच दिमाखदार कामगिरीची अपेक्षा असेल.


​ ​

संबंधित बातम्या