RCB ची बलस्थाने आणि कमजोरी, तर नेमका काय आहे धोका?

सुनंदन लेले
Thursday, 8 April 2021

IPL 2021 : अपयशाचा फेरा तोडण्याचा विराट कोहलीचा निग्रह

IPL 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ कधीच कमजोर वाटत नाही. तरीही आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद त्यांना नेहमी हुलकावणी देत आहे. त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली आहे, पण शेवटच्या पायरीला अडखळणे विराट कोहलीला खटकले नाही तर नवल मानावे लागेल. २०२१ च्या मोसमात अपयशाचा फेरा चांगले क्रिकेट खेळून तोडण्याचा निग्रह विराट कोहली मनात धरून बसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा आढावा.

बलस्थाने : ज्या संघात देवदत्त पडीकलसारखा तरुण गुणवान फलंदाज आहे आणि विराट कोहली, एबी डिव्हिल्यर्स, ग्लेन मॅक्सवेलसारखे तगडे अनुभवी फलंदाज आहेत, त्यांचे बलस्थान फलंदाजीत आहे हे सांगण्याचीही गरज नाही. आरसीबीचे दुसरे बलस्थान त्यांची फिरकी गोलंदाजी. कोहलीच्या भात्यात अ‍ॅडम झंपा, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर असे तीन दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत, तेच संघाची ताकद आहेत.

कमजोरी : फिरक गोलंदाजीत दिसणारी ताकद वेगवान माऱ्यात दिसत नाही, ही मोठी कमजोरी ठरू शकते. मोहंमद सिराजला ताडमाड कायली जेमीसनची साथ लाभणार आहे. दोघेही गोलंदाज ट्वेंटी २० क्रिकेटमध्ये चमकलेले नाहीत. हे लक्षात घेता नव्या चेंडूचा मारा संघाकरता कमजोरी ठरू शकतो.

संधी : कर्णधार कोहलीला सामना खेळणे महत्त्वाचे असते, पण त्यापेक्षा तो जिंकणे जास्त महत्त्वाचे असते. हे लक्षात घेतल्यास कोहली यंदाच्या मोसमात विजेतेपद पटकावण्याकरता जंग जंग पछाडेल यात शंका नाही. कोहली भारतीय संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार असताना त्याच्या बायोडेटामध्ये आयपीएल विजेतेपद नसणे, त्याला शोभत नाही. क्रिकेट जाणकार आणि टीकाकार याकडे आवर्जून लक्ष वेधतात, त्या सर्वांना सडेतोड उत्तर देण्याची नामी संधी कोहलीला आहे. तसेच देवदत्त पडीकलला निवड समितीचे लक्ष वेधून घेण्यास उत्सुक असेल.

धोका : कायली जेमीसनला भरपूर पैसे देऊन कोहलीच्या संघाने विकत घेतला. तो चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. धोका इतकाच आहे, की त्याला भारतीय उपखंडात खेळण्याचा अनुभव नाही. संपूर्णपणे फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर मारा कसा करायचा याचा अनुभव जेमीसनला कमी असल्याचा धोका विराटला लक्षात घ्यावा लागेल. तसेच कोहली सलामीला खेळणार असल्याने नव्या चेंडूवर विकेट गेली तर मधल्या फळीवर मोठे दडपण येण्याचा धोकाही काही प्रमाणात आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या