धवननं सर केलं 'शिखर'; असा पराक्रम करणारा पहिलाच खेळाडू

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 11 April 2021

IPL 2021 : शिखर धवन यानं ५४ चेंडूत ८५ धावांची महत्वाची खेळी केली. या खेळीदरम्यान धवननं १० चौकार आणि दोन षटकारांची बरसात केली.

IPL 2021 : आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली असून आपल्या पहिल्या सामन्यात पंतच्या दिल्ली संघानं धोनीच्या चेन्नई संघाचा पराभव केला आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर दिल्लीनं सात गड्यांनी बाजी मारली. या सामन्यात शिखर धवन यानं ५४ चेंडूत ८५ धावांची महत्वाची खेळी केली. या खेळीदरम्यान धवननं १० चौकार आणि दोन षटकारांची बरसात केली. यासह शिखर धवन यानं अनोखा आणि मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

आयपीएल इतिहासात ६०० चौकार लगावण्याचा कारनामा शिखर धवन यानं केला आहे. असा पराक्रम करणारा शिखर पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात सर्वाधिक चौकार शिखर धवनच्या नावावर आहेत.  या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर असून त्याच्या खात्यात ५१० चौकारांची नोंद आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा चोपण्याचा विक्रम जरी विराटच्या नावावर असला तरी सर्वाधिक चौकारांचा विक्रम मात्र, शिखरच्या नावावर आहे. विराटनं आयपीएलमध्ये आतापर्यंत ५०७ चौकारांची आतषबाजी केली आहे.  

‘मिस्टर आयपीएल’ म्हणजेच सुरेश रैना या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या हंगामात रैना खेळू शकला नव्हता.   कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीर या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. गंभीरनं ४९१ चौकार लगावलेत. दिल्ली संघानं ट्विटरद्वारे शिखर धवनला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या