लागोपाठ तीन पराभव झाल्यानंतर लक्ष्मणने SRH ला झापलं; म्हणाला...

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

७-८ षटकांनंतर चेंडू काहीसा जुना झाल्यावर मोठे फटके मारणे कठीण होत आहे; मग उपाय काय आहे?

चेपॉकच्या विकेटवर जेव्हा मोठे फटके मारता येत नाहीत आणि नुसताच पाय पुढे टाकून बॅट फिरवता येत नाही, तेव्हा मोकळ्या जागेत चेंडू मारून पळून धावा काढण्याचे तंत्र यायलाच हवे. स्ट्राईक रोटेट करता यायला हवा. त्याचबरोबर निर्धाव चेंडूंची संख्या कमी करता यायला हवी. हाच एक चांगला उपाय आणि जो राबवणे अशक्य नक्कीच नाही, असे हैदराबाद संघाचा मेंटॉर व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने सांगितले.

७-८ षटकांनंतर चेंडू काहीसा जुना झाल्यावर मोठे फटके मारणे कठीण होत आहे; मग उपाय काय आहे? पहिल्या काही षटकात चेंडू नवा असताना तो बॅटवर पटकन येतो, त्यावेळी मोठे फटके मारायचे आणि नंतर एकेरी-दुहेरी धाव पळून काढायचा, हाच विजयाचा फॉर्म्युला आहे. अजून स्पर्धेची सुरुवात आहे म्हणून चुका सुधारायला अवधी आहे; पण आता उशीर करता कामा नये. त्याच त्याच चुका करणे टाळले पाहिजे, असे लक्ष्मणने सांगितले.

अक्षम्य चुका केल्या : वॉर्नर
मुंबईविरुद्ध १५० धावांचा पाठलाग करता आला नाही म्हणून खूप निराश झालो आहे. सुरुवात चांगली झाली होती आणि तरीही आम्ही अडखळलो. मला कोणतेही कारणे द्यायचे नाही. आम्ही अक्षम्य चुका केल्या. विकेट थोडी संथ असल्याचे मान्य केले, तरी १५० धावांचा पाठलाग चांगली सुरुवात झाल्यावर न करता येणे बरोबर नाही, अशी नाराजी हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली. यातून लगेच शिकून सुधारणा करणे गरजेचे असल्याचेही मत त्याने व्यक्त केले.

श्रेय संपूर्ण संघाला : ट्रेंट बोल्ट
गेल्या दोन सामन्यातील विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. कारण प्रत्येकाने आपापल्या परीने जोर लावला. कठीण परिस्थितीत विश्वास गमावला नाही आणि लढत देणे थांबवले नाही. हैदराबादसमोरच्या सामन्यात अगदी खरे बोलायचे, तर गरजेच्या धावफलकापेक्षा १५-२० धावा आम्ही कमी केल्या होत्या. चेपॉकच्या विकेटवर त्याची राखण करणे शक्य आहे. सुरुवात समोरच्या फलंदाजांनी चांगली केली, तरी एक- दोन फलंदाज बाद करता आले तर दडपण परत फलंदाजांवर टाकले जाऊ शकते. राहुल चहरच्या ३ विकेटस् आणि हार्दिकने दोन फलंदाजांना स्टंपवर सरळ चेंडू फेकून धावबाद केल्याने समोरच्या संघावर अचानक खूप दडपण वाढले. मला बुमराबरोबर मारा करायला खूप आवडते. कारण त्याच्या डोक्यात काय करायचे, हे स्पष्ट असते, असे मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज टेंट्र बोल्ड म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या