IPL 2021 : धोनीचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी रैनानं कसली कंबर (VIDEO)

सकाळ स्पोर्ट्स टीम
Wednesday, 31 March 2021

रैनाच्या अनुपस्थितीत मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जवर साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढावली होती. 

कोरोनाच्या संकट पुन्हा डोके वर काढत असताना जैव सुरक्षित वातावरणात आयपीएलच्या स्पर्धेचे तयारी सुरु आहे. मागील वर्षी कोरोनामुळे युएईत रंगलेल्या स्पर्धेत आयत्यावेळी धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडणारा रैना पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. धोनी आणि संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी त्याने चांगलीच कंबर कसल्याचे दिसते. आयपीएल स्पेशलिस्टच्या पुनरागमनाने चेन्नई संघाला निश्चितच फायदा होईल. त्यामुळेच कदाचित युएईतील चुकीनंतरही रैनावर संघ व्यवस्थापनाने पुन्हा विश्वास टाकलाय. रैनाच्या अनुपस्थितीत मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जवर साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढावली होती. 

कर्णधार महेंद्रसिंगसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत मैत्रीची एक वेगळी मिसाल सेट करणाऱ्या रैनाने युएईच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. हे सर्व विसरुन रैनाने आता आगामी हंगामाची तयारी सुरु केली आहे. दमदार कामगिरीसाठी उत्सुक असलेल्या रैनाने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. या व्हिडिओला त्याने एक खास कॅप्शन दिले आहे. क्वारंटाईन संपले असून आता जिममध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. जिममध्ये एक वेगळीच प्रेरणा मिळते. इथला जोश काही औरच. अशा आशयाच्या ओळीसह त्याने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

IPL 2021 : पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाचे ओझे

चेन्नई सुपर किंग्जने सुरेश रैनासाठी सीजनसाठी 12.5 कोटी रुपये मिळतात. ही रक्कम त्याचे संघातील महत्त्व किती मोलाचे आहे, हे स्पष्ट करणारी आहे. सुरेश रैनाने 15 ऑगस्ट रोजी महेंद्रसिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यावेळी त्याने धोनीसोबत पिवळ्या जर्सीत आपल्यातील धमक दाखवत राहण्याचा वादा केला होता. वैयक्तिक कारणाचा दाखला देत त्यांनी युएईत रंगलेल्या स्पर्धेतून अचानक माघार घेतली होती.  
सुरेश रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील हंगामात न खेळल्यामुळे तो अव्वलस्थानावरुन दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार सध्याच्या घडीला अव्वलस्थानी आहे. रैनाने  193 सामन्यात 33 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत. यात  1 शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये रैनाच्या खात्यात 194 षटकार आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या