भरघोस कमाई देणारी आयपीएल मोलाचीच; बटलरचे कसोटीपेक्षा या स्पर्धेला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 March 2021

आम्ही सर्व खेळाडू आयपीएलचे महत्त्व जाणतो. यातून खूप मोठा आर्थिक फायदा आम्हाला होतो.  

अहमदाबाद : भरघोस कमाई देणाऱ्या आयपीएलला दुर्लक्षित कसे करणार? आयपीएलऐवजी आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्याचा पर्याय विचारातही घेतलेला नाही, असे इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू जोस बटलर याने सांगितले. इंग्लंडच्या 12 खेळाडूंना आयपीएलमधील विविध संघांनी करारबद्ध केले आहे. 

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर बटलर मायदेशी परतला होता. तो आता मर्यादित षटकांच्या लढती खेळण्यासाठी भारतात आला आहे. तो आयपीएलची सांगता झाल्यावरच मायदेशी परतणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका 2 जूनपासून सुरू होणार आहे, तर आयपीएलची सांगता 30 मे रोजी होईल. बटलरला राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केले आहे. त्याचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरल्यास बटलरला त्या लढती अथवा कसोटी मालिकेकडे दुर्लक्ष करावे लागेल.

आयपीएलसोडून इंग्लंडकडून खेळण्यासाठी परत येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. न्यूझीलंडविरुद्धची मालिका निश्‍चित होण्यापूर्वीच आयपीएलबाबतचा करार झाला होता. आता संघ प्लेऑफसाठी गेल्यास न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेवर पाणी सोडणे भाग पडेल. त्या वेळी परिस्थिती काय असेल, त्यावर सर्व अवलंबून असेल, असे बटलरने सांगितले. 

INDvsENG : सलामीला अनेक पर्याय, पण चौथ्या क्रमांकाबाबत निर्णय नाही

आयपीएलसाठी करारबद्ध झालेल्या काही खेळाडूंचे करार लाखो डॉलरचे आहेत. आयपीएलमधून मिळणारा पैसा लक्षात घेतल्यास ती काहींसाठी खूपच मोठी स्पर्धा होते. क्रिकेट कारकिर्दीची वर्षे कमी होत असताना यांसारख्या स्पर्धांचा फायदा होतो. इंग्लंडकडून खेळणेही मोलाचे आहे. आम्हाला राष्ट्रीय संघाकडून खेळल्याबद्दल चांगले मानधन मिळते, असे बटलरने सांगितले. आयपीएलमधील इंग्लंड खेळाडूंच्या सहभागावरून तेथील मंडळात मतभेद आहेत, असे संकेत बटलरने दिले; पण आयपीएलचा अनुभव भारतातील ट्‌वेंटी 20 विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळी निश्‍चितच उपयोगात येईल, असेही तो म्हणाला. 

आम्ही सर्व खेळाडू आयपीएलचे महत्त्व जाणतो. यातून खूप मोठा आर्थिक फायदा आम्हाला होतो. त्यातून मिळणारा अनुभव तर बोनसच आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी आयपीएलचा होणारा फायदा प्रत्येक जण तुम्हाला सांगू शकेल. क्रिकेट कार्यक्रम आता जास्त खडतर होत आहेत. त्यात नेमका समतोल काय, हे सांगणे अवघड आहे. आम्ही खेळाडू याबाबत इंग्लंड मंडळासह चर्चा करीत आहोत. 
- जोस बटलर


​ ​

संबंधित बातम्या